विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात विचार मनात येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !
‘जन्म, मृत्यू आणि विवाह हे प्रारब्धानुसार होत असतात. पूर्णवेळ साधना करणारे युवा साधक आणि साधिका यांच्या मनात विवाहाविषयी येणारे विविध विचार अन् त्यांवरील योग्य दृष्टीकोन पुढे देत आहे. विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !
१. मी अविवाहित राहिल्यास आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मला कुणाचाच आधार नसेल !
१ अ. विचार : काही साधकांना ‘आई-वडिलांचा मृत्यू झाल्यावर मला कुणाचाच आधार नसेल. मला पुढील आयुष्य एकट्याने काढावे लागेल’, असे वाटते आणि त्यामुळे ‘विवाह करावा’, असा विचार त्यांच्या मनात येतो.
१ आ. योग्य दृष्टीकोन : प्रत्येकाचा खरा आधार भगवंतच असतो. त्यामुळे मायेतील मानसिक आधार मिळण्यासाठी विवाह करण्यापेक्षा साधनेचे प्रयत्न वाढवावेत आणि सतत आपल्यासमवेत राहून कृपेचा वर्षाव करणार्या चिरंतन अशा भगवंताच्या अस्तित्वाची अनुभूती घ्यावी.
२. माझ्या प्रारब्धातच विवाह असल्याने मला त्याविषयी विचार येत आहेत !
२ अ. विचार : बर्याच साधकांना ‘माझ्या प्रारब्धातच विवाह असल्याने मला तसे विचार येत आहेत’, असे वाटते.
२ आ. योग्य दृष्टीकोन : संकल्प-विकल्प हे मनाचे कार्य असल्यामुळे नानाविध विचार मनात येणे स्वाभाविक आहे. ‘मनात विचार आले, म्हणजे आपल्या प्रारब्धात विवाह असणार’, असा चुकीचा दृष्टीकोन साधकांनी ठेवू नये. त्याऐवजी ‘९९ टक्के प्रारब्ध असले, तरी भगवंताने दिलेले १ टक्का क्रियमाण १०० टक्के वापरले, तरी आपण त्यावर सहज मात करू शकतो’, हे लक्षात घ्यावे.
३. संतांनी मला विवाहाच्या संदर्भात विचारले आहे, म्हणजे मला विवाहयोग आहे का ?
३ अ. विचार : काही साधकांना ‘तुम्ही विवाहाच्या संदर्भात काय निर्णय घेतला आहे ?’ असे संत विचारतात. त्या वेळी साधकांच्या मनात ‘मला संत विवाहाच्या संदर्भात विचारत आहेत, तर माझ्या प्रारब्धात विवाह आहे का ?’ असे वाटते आणि त्यांची द्विधा मनःस्थिती होते.
३ आ. योग्य दृष्टीकोन : स्वतःच्या मनानेच संतांच्या बोलण्याचा भावार्थ ठरवणे अयोग्य आहे. अध्यात्मातील अधिकारी असलेले संत साधकांना मायेच्या बंधनात अडकण्यासाठी कशाला सांगतील ?
४. साधना चांगली होत नसल्याने माझ्या मनात विवाहाचे विचार येत आहेत !
४ अ. विचार : विवाह करण्याच्या संदर्भात किंवा एखाद्या साधकाविषयी अथवा साधिकेविषयी विचार येत असल्यास काही साधकांना ‘माझी साधना होत नाही; म्हणून मला असे वाटत आहे’, अशा अपराधीपणामुळे ते स्वतःला दोष देऊ लागतात.
४ आ. योग्य दृष्टीकोन : तरुण वयात विवाहाच्या संदर्भात विचार येणे नैसर्गिक आहे. त्यामुळे त्यासाठी स्वतःला दोषी ठरवण्याऐवजी या विचारांवर मात करण्यासाठी साधकांनी विचारांच्या तीव्रतेनुसार आवश्यक त्या स्वयंसूचना घ्याव्यात.
५. इतरांचा विवाह ठरल्याचे समजल्यावर पुढील दृष्टीकोन ठेवा !
नातेवाईक, मित्र-मैत्रीण यांचा विवाह निश्चित झाल्याचे समजल्यावर काही साधकांच्या मनात स्वतःच्या विवाहाचे विचार येऊ शकतात. साधनेचे प्रयत्न तळमळीने करत राहिल्यास कालांतराने हे विचार येणे आपोआपच बंद होईल. त्या विचारांची काळजी करू नये !
६. विवाहाचे विचार अल्प होण्यासाठी साधना वाढवणे आवश्यक !
साधना करतांना आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली, तर मायेची ओढ हळूहळू न्यून होते आणि त्यामुळे ‘विवाह करावा’, असे वाटणे अल्प होत जाते. साधनेमुळे मिळणार्या आनंदाची अनुभूती आली की, विवाहामुळे मिळणार्या सुखाची ओढ उणावते अन् त्यामुळे ‘विवाह करावा’, असे वाटणे उणावत जाते.
बर्याच साधकांच्या मनात वरीलप्रमाणे विचार आल्यावर ते समवयीन साधकांशी मोकळेपणाने बोलतात. साधनेच्या दृष्टीने योग्य दृष्टीकोन घेण्यासाठी साधकांनी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत साधकाशी या संदर्भात बोलावे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.