ब्रिटनमधून आलेले २९९ प्रवासी मुंबईतील उपाहारगृहांमध्ये विलगीकरणात
लक्षणे नसतांनाही कोरोनाबाधित झालेल्यांचे आणखी १४ दिवस विलगीकरण
मुंबई – ब्रिटन येथून विमानातून २२ डिसेंबरला ५९० प्रवासी मुंबईत आले असून त्यापैकी २९९ प्रवाशांना उपाहारगृहामध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
विदेशातून येणार्या प्रवाशांची विमानतळांवर पडताळणी केली जात आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना सेव्हन हिल रुग्णालय, तर युरोप आणि आखाती देशांतून आलेल्या अन् लक्षणे असलेल्या प्रवाशांना जी.टी. रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जे प्रवासी राज्याबाहेरील आहेत, त्यांना लागूनच असलेल्या (कनेक्टिंग फ्लाईट) विमानाने जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
ब्रिटन, युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणार्या प्रवाशांची त्यांच्या आवडीच्या उपहारगृहामध्ये स्वव्ययाने निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘पाचव्या आणि सातव्या दिवशी करण्यात येणार्या कोरोनाच्या चाचणीचा व्ययही त्यांनाच करावा लागणार आहे’, असे पालिका अधिकार्यांनी सांगितले. चाचणीनंतर कोरोनाची बाधा असल्याचे निदर्शनास आले; पण जरी लक्षणे नसतील, तरी त्या प्रवाशाला त्याच उपहारगृहामध्ये आणखी १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे.