मूठवाडी, उभादांडा (वेंगुर्ला) येथील श्री केपादेवीचे एक पुरातन आणि जागृत देवस्थान !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन आणि जागृत देवस्थानांपैकी वेंगुर्ला तालुक्यातील मूठवाडी, उभादांडा येथील श्री केपादेवी हे एक आहे. श्री केपादेवी ही गिरप बांधवांची कुलदेवता असली, तरी तालुक्यातील सर्व रयतेची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. या देवतेचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी म्हणजे २४ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे.
संकलक : श्री. गोपाळ जुवलेकर, वेंगुर्ला
इतिहास
मंदिराच्या इतिहासाविषयी कुठेही लेखी माहिती नाही; परंतु काही जाणकारांकडून असे कळते की, १५ व्या शतकात गोव्यातील पोर्तुगीज अत्याचाराच्या काळात देवीची मूर्ती गोव्यातून आणून मूठवाडीमध्ये तिची स्थापना केली असावी. काही जणांच्या मते ही मूर्ती मूठ येथेच केगदाच्या (केवडा) वनात सापडली; म्हणून तिला केगदीदेवी हे नाव पडले आणि कालांतराने केगदीचे केपादेवी झाले, तसेच सर्व प्राणीमात्रांंवर कृपा करणारी म्हणून कृपादेवीचे नाव केपादेवी झाले असावे, असा अंदाज काही जणांनी व्यक्त केला.
मूर्तीची रचना
श्री देवीची अप्रतिम मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. या मूर्तीला ४ हात असून एका हातात तलवार, दुसर्या हातात ढाल, तिसर्या हातात त्रिशूळ आणि चौथ्या हातात महिषासुराचे मुंडके आहे. रेड्याचे शिर कापून महिषासुराला रेड्याच्या पोटातून बाहेर काढून त्याचा शिरच्छेद केलेला आहे. रेड्याचे कापलेले शिर तिच्या बाजूला पडलेले आहे. महिषासुराचा वध करूनही देेवीचा चेहरा सौम्य आणि शांत आहे. देवीच्या मूर्तीला शेकडो वर्षे स्नान घालून पूजा अर्चा केली जाते, तरीही मूर्तीची कोणत्याही प्रकारे झीज झालेली नाही. मूर्तीची स्थापना कधी केली आहे, हे कुणालाही ठाऊक नाही. कदाचित् ही मूर्ती परशुरामकालीन असून ती मसुरीवरून आणली असावी, असा अंदाज आहे.
देवीचे ७ मानकरी असून कुर्लेवाडी, डिचोलकरवाडी, बेहरेवाडी, चमणकरवाडी, करंगुटकरवाडी, कांबळीवाडी आणि तुळसकरवाडी या मानकरी वाड्या आहेत. हे सर्व उपस्थित राहिल्यानंतरच देवळातील प्रत्येक उत्सवाला प्रारंभ होतो. गिरप हे देवीचे पुजारी आहेत. त्यांना काही अडचण आल्यास त्या वेळी त्यांचे भाचे सावंत, तांडेल यांच्याकडून पूजा-अर्चा करून घेतली जाते. देवीचे पुरोहित म्हणून फाटकगुुरुजींना मान आहे. देवीचे सेवेकरी म्हणून श्री. द्वारकानाथ वेंगुर्लेकर हे काम पहातात.
मंदिरातील उत्सव
नवरात्रोत्सव, दसरा, तुळशीविवाह, कार्तिक पाडवा, जत्रोत्सव आणि समराधना, शिमगा, चैत्र पाडवा (गुढीपाडवा) हे महत्त्वाचे उत्सव या मंदिरात साजरे केले जातात. देवीच्या गाभार्यात देेवीच्या उजव्या बाजूला ४ मूर्ती आणि डाव्या बाजूला ४ मूर्ती आहेत. उजव्या बाजूला पूर्वस, गिरप वस, आणि ब्राह्मणाच्या २ मूर्ती, तर डाव्या बाजूस जळबांदेश्वर, हेळेकर आणि इतर २ देवांच्या मूर्ती आहेत. कुळाचे देऊळ (कुळकार), पासलय देव, आगयो वेताळ (पययाचा पूर्वस), कारवारदेवी यांची देखभाल श्री. पुंडलिक शंकर गिरप आणि इतर स्थानिक गिरप मंडळी करतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहनयावर्षी जत्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाच्या अनुषंगाने असलेले नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. |