कुंकळ्ळीतील महानायकांच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत करा ! – भारतमाता की जय
‘कुंकळ्ळी महानायक वंदना’ मेळावा !
पणजी – १५ जुलै हा दिवस कुंकळ्ळी हुतात्मा दिन म्हणून घोषित करणे, कुंकळ्ळीच्या लढ्यावर चित्रपट बनवणे आणि महानायक हुतात्मा स्मारकाचे विस्तारीकरण अन् सुशोभिकरण करून त्याच्या कायमस्वरूपी देखभालीची व्यवस्था करणे, अशा गेली १२ वर्षे प्रलंबित ठेवलेल्या कुंकळ्ळी ग्रामस्थांच्या मागण्या गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षांच्या शुभनिमित्ताने सरकारने पूर्ण कराव्यात, असे आवाहन भारतमाता की जय संघाचे राज्यसंरक्षक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दक्षिण गोव्यासाठी योजलेल्या ‘कुंकळ्ळी महानायक वंदना’ मेळाव्यात बोलतांना केले.
प्रा. दत्ता पुरुषोत्तम नाईक यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करून कुंकळ्ळीतील १६ महानायकांच्या पोर्तुगिजांविरुद्धच्या लढ्याची पार्श्वभूमी सांगितली. पत्रकार शिक्षक विजयकुमार कोप्रेदेसाई यांनी हुतात्मा स्मारकाच्या निर्मितीचा इतिहास सांगितला.
हुतात्मा स्मारकाला प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सर्वप्रथम हार अर्पण करून अभिवादन केले. गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी कुंकळ्ळीच्या लढ्याला योग्य स्थान आणि प्रतिष्ठा सरकारने मिळवून द्यावी; म्हणून कराव्या लागणार्या चळवळीत आपला पक्ष पूर्णपणे उतरेल, असे घोषित केले. संजय राऊतदेसाई यांनी सांघिक स्फूर्तीगीत सांगितले. सर्व उपस्थितांनी हुतात्मा स्मारकास पुष्पसमर्पण केले.
कार्यक्रमास उपस्थितांमध्ये कुंकळ्ळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष देवेंद्र देसाई, माजी नगराध्यक्षा लाविता मास्कारेन्यश आणि आंजेला लुईस, माजी उपनगराध्यक्ष पोलिता कार्नेरो आणि मारियो मोराईश, आग्रिकोला सोसियेदादचे अध्यक्ष शाबा देसाई, माजी भाजपाध्यक्ष विशाल देसाई, संघचालक श्रीपाद देसाई, भारतमाता की जय संरक्षक प्रा. आनंद देसाई, कार्यकर्ते नारायण देसाई, सूरज देसाई आदींची उपस्थिती लाभली.