गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे विधानसभेत लावा !

सत्तरी इतिहास संवर्धन समितीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी

वाळपई, २३ डिसेंबर (वार्ता.) – गोवा शासन गोवा मुक्तीदिनाचा हिरक महोत्सव साजरा करत आहे. या पार्श्‍वभूमीवर गोवा विधानसभेच्या संकुलात गोवा मुक्तीलढ्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे लावावीत. क्रांतीवीर दीपाजी राणे यांचा भव्य अश्‍वारूढ पुतळा सांखळी येथील रवींद्र भवनाच्या प्रांगणात उभारण्यात यावा, अशी मागणी सत्तरी इतिहास संवर्धन समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

सत्तरी इतिहास संवर्धन समितीच्या सदस्यांनी सांगितले की, क्रांतीवीर दीपाजी राणे यांचा भव्य अश्‍वारूढ पुतळा उभारण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे ते गोवा विधानसभेचे सभापती असतांना केली होती. वाळपई सरकारी रुग्णालयाला क्रांतीवीर दीपाजी राणे यांचे नाव देण्याची मागणी करणारा ठराव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्तरी इतिहास संवर्धन समितीच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्यापूर्वी विधानसभेत मांडला होता. आज क्रांतीवीर दीपाजी राणे यांचे स्मारक किंवा पुतळा गोव्यात कुठेच नाही. याची नोंद गोवा शासनाने गोवा मुक्तीदिनाच्या हिरक महोत्सवप्रसंगी घ्यावी. गोवा मुक्तीदिनाचा हिरक महोत्सव हा सर्व गोमंतकियांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याने याचे कुणीही राजकारण करू नये.