‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ३’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील त्यांच्या छायाचित्राला आत्मनिवेदन केल्यावर ग्रंथावर पिवळसर रंगाची छटा दिसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. मुलाशी मतभेद होऊन वाईट वाटणे आणि ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला आत्मनिवेदन करणे

‘२६.६.२०२० या दिवशी माझा मुलगा सौरभ याच्याशी माझे मतभेद झाले. तो माझे म्हणणे मान्य करत नव्हता. मला त्याचे वाईट वाटले. मी याविषयी कुणाशीही बोलू शकले नाही. मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ३’ हा ग्रंथ जवळ घेऊन त्यांच्या छायाचित्राला आत्मनिवेदन केले.

ग्रंथाचे मूळ मुखपृष्ठ                                              पिवळी छटा आलेले साधिकेकडील ग्रंथाचे मुखपृष्ठ

२. यजमानांनी चुकीची जाणीव करून देऊन अंतर्मुख होण्यास सांगणे

सौ. सुमा पुतलथ

दुसर्‍या दिवशी रात्री माझे यजमान श्री. सुदीश यांचा मला भ्रमणभाष आला.  मी त्यांना माझ्या त्रासाविषयी सांगितले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘सुमा, तू अंतर्मुख कधी होणार आहेस ? हे सर्व होत राहील; पण ‘त्याचा तुझ्यावर परिणाम होत असेल, तर तुझे काहीतरी चुकत आहे’, याचा विचार कर.’’

३. स्वत:विषयी नकारात्मक विचार येणे,परात्पर गुरु डॉक्टर यांच्याशी सूक्ष्मातून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं याविषयी बोलणे

त्यानंतर मला स्वत:विषयी अधिकच नकारात्मक विचार येत होते. मी परात्पर गुरु डॉक्टरांशी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांविषयी सूक्ष्मातून बोलत राहिले. तेच मला यातून बाहेर पडण्यास आणि अंतर्मुख होण्यासाठी साहाय्य करू शकतात. मी त्यांना सांगितले, ‘कोणत्याही घटनेनंतर मी अंतर्मुख होऊन विचार का करू शकत नाही ?’ ‘त्यांनी मला साहाय्य करावे’, अशी मी प्रार्थना करत होते. तो ग्रंथ जवळ घेऊन माझे नामजप करणे, बोलणे आणि रडणे, असे चालू होते. नंतर ‘मला कधी झोप लागली ?’, ते मला कळले नाही.

४. ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्रातील परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा आणि गळा यांवर पिवळी छटा दिसणे आणि परात्पर गुरु डॉक्टर समवेत असल्याचे जाणवून आत्मविश्‍वास वाढणे

मला सकाळी जाग आल्यावर मी त्या ग्रंथाकडे पाहिले. तेव्हा मला त्यावर पिवळसर रंग दिसला. मी माझे उपनेत्र (चष्मा) लावून पाहिले. मला परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा आणि गळा यांवर पिवळी छटा दिसली. मला दोन अक्षरे पिवळी दिसली. मला हे पाहून पुष्कळ आनंद झाला आणि मला कृतज्ञता वाटली. ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत आहेत आणि ते मला अंतर्मुख करणार आहेत. मला केवळ प्रत्येक घटनेचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून शिकावे लागेल अन् पुढे ते बघून घेतील’, असा मला आत्मविश्‍वास वाटला.’

– सौ. सुमा पुतलथ, कोची सेवाकेंद्र (१८.११.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक