महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने आयोजित केलेल्या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

(भाग १६)

भाग १५. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/433891.html


३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन

३ ऊ. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे, ही आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे’, हे मनावर बिंबवणे आवश्यक !

श्री. ट्रंग वेन : माझ्यात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक असलेली लढाऊवृत्ती अल्प आहे. ती वाढवण्यासाठी मी काय करू ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्हाला स्वभावदोषांशी लढायचे नाही, तर स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे महत्त्व स्वतःच्या मनावर बिंबवायचे आहे. ईश्‍वरामध्ये एकही स्वभावदोष नाही. तुमच्यात स्वभावदोष असतील, तर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करता येईल का ?

३ ए. अनावश्यक जिज्ञासा असणे, हा साधनेतील अडथळा असून या स्वभावदोषावरही स्वयंसूचना देणे आवश्यक

सद्गुरु सिरियाक वाले : कार्यशाळेत सौ. प्रेमा, श्री. ट्रंग आणि कु. मिल्की पुष्कळ प्रश्‍न विचारतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘कधीही न संपणारे प्रश्‍न विचारणे’ या स्वभावदोषावरही तुम्ही (कु. मिल्की) स्वयंसूचना द्या; कारण तो तुमच्या साधनेतील अडथळा आहे. प्रश्‍न विचारण्यामध्ये अनेक जन्म वाया जातात. प्रत्येक क्षणाला तुमच्या मनात प्रश्‍न असतील. काहींना उत्तरे मिळतील आणि काही तुमच्या मनात तसेच रहातील. मिळालेल्या उत्तरांमधूनही अनेक प्रश्‍न उद्भवतील. ही सर्व माया आहे. काहींना पैशाचे, काहींना शारीरिक सौंदर्याचे आकर्षण असते, तर काहींना बौद्धिक ज्ञानाचे ! असे ज्ञान निरर्थक असते. भौतिक विज्ञानामध्ये पूर्वी केलेल्या शोधावर पुन्हा संशोधन होते आणि जुने संशोधन अवैध मानले जाते; मात्र अध्यात्मातील सिद्धांतांमध्ये कुणीही पालट करू शकत नाही. कोट्यवधी वर्षांनंतरही ते अबाधित रहाते. विज्ञानाने केलेल्या छोट्या छोट्या संशोधनांचा अभ्यास करण्यापेक्षा ‘ती माया आहे’, हे समजणे महत्त्वाचे आहे. केवळ शाश्‍वतच सत्य असते. तुझ्या साधनेतील बुद्धीचा अडथळा दूर करण्यासाठी स्वयंसूचना दे. याविषयी काही प्रश्‍न आहे का ?

कु. मिल्की : नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : या क्षणापासून बुद्धीचा लय करण्याचा प्रयत्न करत आहेस ! छान !

४. प्रीती

४ अ. व्यवहारातील प्रेम अपेक्षांसहित, तर अध्यात्मातील प्रेम अपेक्षारहित (निरपेक्ष) असणे  

पू. (सौ.) भावना शिंदे : मला समष्टीप्रती (कार्यशाळेतील उपस्थितांप्रती) पुष्कळ कृतज्ञता वाटते; कारण कार्यशाळेतील उपस्थितांच्या समवेत असतांना मला प्रीती अनुभवता येते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : व्यवहारात प्रेम अनुभवायला मिळते. आता तुम्ही साधकांविषयी वाटणार्‍या प्रीतीची अनुभूती घेत आहात. आपल्या वैयक्तिक जीवनात आपल्याला इतरांविषयी वाटणारे प्रेम हे मानसिक स्तरावरचे असते. साधनेला आरंभ केल्यावर काही काळाने आपल्याला इतरांविषयी वाटणारे प्रेम हे आध्यात्मिक स्तरावरील होते. या प्रेमात इतरांकडून कोणत्याही अपेक्षा नसतात. मायेतील प्रेम हे मानसिक स्तरावरील असते. त्यात एखाद्या व्यक्तीने कुणासाठी काहीतरी केले की, ती व्यक्ती ‘त्याने त्याची परतफेड करावी’, अशी अपेक्षा करते. अध्यात्मात प्रेम हे एकतर्फी असते, त्यात आपण केवळ इतरांवर प्रेम करतो. छान !

४ आ. साधकांविषयी प्रेम वाटणे हे आध्यात्मिक गुणवैशिष्ट्य आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले (सौ. प्रेमा लूझ हेर्नाडेझ आणि मिल्की अगरवाल यांना उद्देशून) : तुमच्यात मैत्री झाली कि नाही ?

मिल्की अगरवाल : हो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : येथून घरी परत गेल्यावर तुम्ही एकमेकांच्या संपर्कात रहाणार आहात कि ही मैत्री सुटीमध्ये झालेल्या तात्पुरत्या मैत्रीसारखी आहे ? सुटी संपून गेल्यावर एकमेकांना विसरून जाणार नाही ना ? ईश्‍वर संपूर्ण विश्‍वाला आपले मानतो. त्याप्रमाणे आपल्यालाही साधना करणारे सर्व जीव आपले वाटले पाहिजेत. अशामुळे अध्यात्मात रस असणार्‍या प्रत्येक जिवावरचे प्रेम वाढत जाईल. ‘सर्व साधकांवर प्रेम करणे’, हेसुद्धा साधकाचे गुणवैशिष्ट्य आहे. तुम्ही हा गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाल; मात्र एकमेकांशी बोलतांना मायेतील गोष्टी न बोलता साधनेविषयी बोलायला हवे.

(क्रमश:)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास :
याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग १७ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/434480.html