कामळेवीर (सिंधुदुर्ग) येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा जत्रोत्सव
संकलक : श्री. संदीप आळवे, कामळेवीर, सिंधुदुर्ग
कुडाळ तालुक्यातील कामळेवीर बाजारपेठ येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव २४ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे. या मंदिरात प्रत्येक एकादशीच्या दिवशी हरिपाठ म्हटला जातो, तसेच श्री रामनवमी आणि मार्च मासात श्री विठ्ठल-रखुमाईचा वाढदिवस साजरा केला जातो.
मंदिरात वर्षभरात कीर्तन, प्रवचन यांसारखे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही दिवशी दिंडीचा मोठा कार्यक्रम असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह शेजारच्या गोवा राज्यातूनही या जत्रोत्सवाला भाविक मोठ्या संख्येने येतात. श्री. दिनकर हेवाळेकर हे मंदिरातील नित्यपूजा करतात.
जत्रोत्सवाच्या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून नित्यपूजा, अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी यांनी जत्रोत्सवास प्रारंभ होतो, तसेच दुपारी महाप्रसाद आणि रात्री १०.३० वाजता देवाच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर रात्री दशावतारी नाट्यप्रयोग होऊन उत्सवाची सांगता होते. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर देस्थान समितीने केले आहे.
जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन
यावर्षी जत्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाच्या अनुषंगाने असलेले नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री विठ्ठलाचा इतिहास
२८ युगे उभा असणे
१. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ × ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे.
२. ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ असणे आणि त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणे : ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; म्हणून विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा आहे; कारण हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.’
३. ‘विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. ‘उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री विठ्ठल’)
श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान
काळ्या रंगाची, बटबटीत डोळ्यांची, दोन्ही हात कटीवर (कमरेवर) ठेवलेली आणि विटेवर उभी, अशी श्री विठ्ठलाची मूर्ती असते. पुंडलिकाने केलेल्या आई-वडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन श्री विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने श्री विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आई-वडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात श्री विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता श्री विठ्ठल सर्वत्र साक्षीभावाने पहाणारा श्री विठ्ठल त्यात दाखवला आहे. कटीच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कटीवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये नियंत्रणात असलेला.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री विठ्ठल’)