गरीब व्यक्तीलाही अर्पण देता यावे, यासाठी श्रीराममंदिरासाठी समाजातून वर्गणी गोळा केली जात आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस

मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – अयोध्येत श्रीराम मंदिर बांधायला धन देण्यासाठी समाजातील श्रीमंत व्यक्तीही पुढे येतील. प्रभु श्रीरामांविषयी समाजात तेवढी आस्था आहे; मात्र गरिबातील गरीब व्यक्तीलाही मंदिरासाठी अर्पण देता यावे, यासाठी समाजातून वर्गणी गोळा केली जात आहे, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. २२ डिसेंबर या दिवशी भाजपच्या दादर येथील ‘वसंत स्मृती’ कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,


१. सोमनाथ मंदिराच्या पुनर्रुद्धाराच्या वेळी ‘मंदिर शासकीय निधीतून व्हावे कि समाजातून वर्गणी गोळा करून ?’ असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या वेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिरावरील आक्रमण हे भारताच्या संस्कृतीवरील आक्रमण आहे. त्यामुळे ‘शासकीय निधीतून मंदिर व्हायला हवे’, अशी भूमिका घेतली.

२. भारतात सर्वधर्मसमभाव असल्याचे सांगून पंतप्रधान नेहरू यांनी त्याला विरोध दर्शवला होता. ‘सर्वधर्मसमभाव’ याचा अर्थ ‘धर्माला न मानणारे’ असा होत नाही. प्रभु श्रीराम धर्म, संस्कृती आणि अस्मिता यांचे प्रतीक आहे.

३. गांधीजी यांनी ‘श्रीराम शासनाचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे आहेत’, असे सांगितले होते. त्यामुळे जनतेच्या वर्गणीतून सोमनाथ मंदिर उभारण्याचे सुचवले. त्याप्रमाणे श्रीराममंदिरही जनतेच्या वर्गणीतून होणार आहे.

४. वर्ष २०२४ मध्ये निवडणुका आहेत. तोपर्यंत श्रीरामाचे मंदिर पूर्ण होऊन दर्शनही घेता येईल.

५. अयोध्येत मंदिर बांधायला अन्य भूमी नव्हती का ? मात्र केवळ रामलल्ला जेथे विराजमान होते, तीच भूमी बाबरचा सेनापती मीर बाकी याला दिसली. अतिशय समृद्ध असलेल्या येथील संस्कृतीला नष्ट करायचे असेल, तर या संस्कृतीचा आत्मा प्रभु श्रीराम यांचे मंदिर उद्ध्वस्त करून हिंदूंचा आत्मा मारण्याचा संकेत त्याने दिला.

६. प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी दिलेला वारसा इतका समृद्ध आहे की, जगातील त्रस्त झालेल्या सर्व लोकांना भारताने आश्रय दिला. भारताने आक्रमकांनाही या भूमीत सामावून घेतले.

७. माधव भंडारी यांनी रामजन्मभूमीविषयी संपूर्ण संशोधन करून पौराणिक, सांस्कृतिक आणि कायदा अशा सगळ्या अंगांनी परिपूर्ण असे हे पुस्तक लिहिले आहे. इतिहासातील सर्व घडामोडींचा अभ्यास आणि ऐतिहासिक दाखले या पुस्तकात आहेत. यामध्ये कोणतेही राजकीय भाष्य नाही.