‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी अन्य पर्याय उपलब्ध होतो का ? हे पहात आहोत ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

एकनाथ शिंदे

मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – ‘मेट्रो ३’च्या कारशेडचा प्रश्न हा जनतेच्या हिताचा विषय आहे. त्यामुळे खरेतर केंद्रशासनाने यासाठी सहकार्य करणे अपेक्षित होते; मात्र केंद्रशासनाने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यामुळे यासाठी आता किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे मेट्रो ३ च्या कारशेडसाठी अन्य पर्याय उपलब्ध होतो का ? हे पहात आहोत, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.


येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीविषयी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘आरे येथे केवळ ‘मेट्रो ३’ची कारशेड होणार होती; मात्र कांजूरमार्ग येथील मेट्रो ३, ४ आणि ६ ची कारशेड होणार होती. त्याचप्रमाणे येथून बदलापूर, ठाणे येथपर्यंत मेट्रो जाणार आहे. याचा लाभ १ कोटी नागरिकांना होणार आहे. यामध्ये विरोधक राजकारण करत आहेत.’’ ग्रामपंचायत निवडणुकीविषयी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्यात जात नाहीत; मात्र या वेळी सरपंचाची निवड सदस्यांतून होणार आहे. सरपंचाची निवडणूक मात्र महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले आहे.’’

रत्नागिरीवासियांच्या हिताचा निर्णय घेऊ !


नगरपालिका आणि नगरपंचायत वगळून रत्नागिरी जिल्हा ‘ॲग्रिकल्चर झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. याविषयी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘याविषयी प्रक्रिया चालू आहे. राज्यशासन जनतेच्या हिताचाच निर्णय घेईल.’’