वसई (जिल्हा पालघर) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून रस्त्यावर फेकणार्या नराधमाला अटक
|
मुंबई – मुंबई उपनगरातील वसई येथे ३४ वर्षांच्या वासनांधाने ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून ती मृत झाली आहे, असे समजून पिशवीत भरून रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी या नराधमाला अटक केले असून त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे. त्याच्यावर अपहरण, बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीवर उपचार चालू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
१. बलात्कारी नराधम अंधेरी येथील एका खासगी आस्थापनामध्ये कर्मचार्यांना ने-आण करणार्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. वसई येथून कर्मचार्यांना सोडण्यासाठी जातांना बस भाईंदर (पश्चिम) येथील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ उभी करून तो सहकार्यांसमवेत मद्यपान करत होता.
२. दुपारच्या वेळी जातांना काही मुले बसमध्ये खेळत होती. त्यातील पीडित मुलगी गाडीत झोपली होती. तिला बसमधून न उतरवताच चालक बस घेऊन निघून गेला. त्यानंतर बस अन्य ठिकाणी उभी करून चालकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
३. पीडित मुलगी ओरडू नये; म्हणून त्याने तिचा गळा दाबला. मुलगी मृत झाली असल्याचे समजून तिला पिशवीत भरून वसई येथील फादरवाडी पेट्रोल पंपाजवळ फेकून दिले. रस्त्यावरून जाणार्या एका व्यक्तीला पिशवीत हालचाल दिसल्यामुळे पाहिले असता त्यामध्ये मुलगी आढळली.
४. याविषयी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस त्वरित घटनास्थळी पोचले आणि मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात नेले. त्वरित उपचार मिळाल्याने मुलीचे प्राण वाचले आहेत. या प्रकरणी भाईंदर येथील पोलिसांनी चालकाला वसई येथून अटक केले आहे.