सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पहाणी
सोलापूर – केंद्र सरकारच्या अधिकार्यांच्या पथकाने येथे अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची २२ डिसेंबर या दिवशी पहाणी केली. या वेळी त्यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव आणि पेनूर येथे झालेल्या हानीक्षेत्राची पहाणी केली. ऑक्टोबरमध्ये सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. त्याची पहाणी केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव यशपाल, तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यासह अन्य अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान सकाळी शासकीय विश्रामगृह येथे यशपाल आणि व्यास या अधिकार्यांनी सर्व अधिकार्यांची बैठक घेतली. या वेळी कृषी अधीक्षक रवींद्र माने, महावितरणचे ज्ञानदेव पडळकर यांनी शेती, वीजयंत्रणा, रस्ते यांच्या झालेल्या हानीविषयी माहिती दिली.