मुरगाव शहराला दिलेले वास्को-द-गामा नाव आणि विविध सार्वजनिक ठिकाणांना दिलेली पोर्तुगीज नावे पालटावी ! – भारतमाता की जय संघटना
गेल्या ६० वर्षांत हा पालट झालेला नसणे गोमंतकियांसाठी दुर्दैवी ! टी.बी. कुन्हा यांनी म्हटल्याप्रमाणे ‘गोंमतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्हास’ तो हाच !
वास्को, २२ डिसेंबर (वार्ता.) – गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षात शासनाने गोवा मुक्तीच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, मुरगाव शहराला दिलेले पोर्तुगीज दरोडेखोर वास्को-द-गामा याचे नाव तात्काळ पालटावे, गोव्यातील विविध रस्त्यांना, तसेच सार्वजनिक ठिकाणांना असलेली पोतुगीज नावे पालटावीत आणि गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची कायमस्वरूपी देखभाल करावी, अशा मागण्या ‘भारतमाता की जय’ या संघटनेकडून गोवा मुक्तीसाठी बलीदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वहाण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आल्या. गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवाचे औचित्य साधून ‘भारतमाता की जय’ संघटना, तसेच गोवा सुरक्षा मंच, भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि अन्य राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी येथील हुतात्मा स्मारकाकडे एकत्र येऊन गोवा मुक्तीलढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांना पुष्पांजली अर्पण केली आणि घोषवादनाने आदरांजली वाहिली. ‘भारतमाता की जय’ संघटनेचे गोवा राज्य संरक्षक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण नेसवणकर आणि गोवा सुरक्षा मंचचे गोवा राज्य अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहिली. या वेळी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई म्हणाले, ‘‘गोवा पोर्तुगिजांपासून ६० वर्षांपूर्वी मुक्त झाला असला, तरी पोर्तुगीज गुलामगिरीतून आजही आपण मुक्त झालेलो नाही. पोर्तुगीज दरोडेखोर वास्को-द-गामा याचे मुरगाव शहराला दिलेले नाव, विविध रस्त्यांची, तसेच सार्वजनिक ठिकाणांची अजूनही न पालटलेली पोर्तुगीज नावे या गुलामगिरीच्या खुणा ६० वर्षांनंतर आपण आजही मिरवतो, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.’’
प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील विविध रस्त्यांना तसेच सार्वजनिक ठिकाणांना दिलेल्या पोर्तुगीज नावांची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, ‘‘कुंकळ्ळीच्या हुतात्म्यांची माहिती अभ्यासक्रमात यावी, यासाठी कित्येक वर्षे प्रयत्न चालू आहेत; परंतु कुठल्याही शासनाने अजून त्या प्रयत्नांना प्रतिसाद दिलेला नाही. राष्ट्रवादी जनतेने शासनाचा निषेध करून हे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’’
भारतमाता की जय संघटनेचे उत्तर गोवा कार्याध्यक्ष श्री. संतोष धारगळकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. श्री. गणेश गावडे यांनी सूत्रसंचालन केले. भारतमाता की जय संघटनेच्या घोषपथकाच्या घोषवादनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला गोव्यातील विविध भागांतून पुरुष आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.