‘गटार आणि रस्ते’ यांच्या पलीकडे जाऊन मानवाच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा
पणजी, २२ डिसेंबर (वार्ता.) – पायाभूत सुविधांच्या विकासावरच भर देण्याऐवजी मानवाच्या विकासाकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांना केले. नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. पुढील ५ वर्षांत दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायतींसाठी ‘जिल्हा भवन’ उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘सदस्यांनी ‘गटार आणि रस्ते’ या पलीकडे मानवाच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. मानवाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. शेतकरी, दीनदुबळे, विकलांग आदींसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ‘उमीद’ या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पंचायतीला प्रतिवर्ष १ लाख ५० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य होत असते. या योजनेचा केवळ ३५ टक्के पंचायतींनी लाभ घेतलेला आहे.’’
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची अधिसूचना शासनाने प्रसिद्ध केली आहे.