नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे साहाय्य
कणकवली – तालुक्यातील कोंडये येथील सौ. मयुरी मंगेश तेली या ऑक्टोबर २०२० मध्ये अतीवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेल्या होत्या. सौ. मयुरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाल्यामुळे महसूल विभागाने त्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला संमती देतांना शासनाने ४ लाख रुपयांचे साहाय्य तेली कुटुंबियांना संमत केले. येथील तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते या रकमेचा धनादेश कै. (सौ.) मयुरी यांचे पती मंगेश पांडुरंग तेली यांना देण्यात आला. या वेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजन चिके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.