महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्‍वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.                                        

(भाग १५)

भाग १४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/433508.html


३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन

३ उ. साधनेत सातत्य आणण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न ध्येय अन् समयमर्यादा घालून करणे आवश्यक !  

श्री. ट्रंग वेन : घरात मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होतो. घरी परतल्यावर ‘साधनेत सातत्य रहाणार नाही’, या विचाराने मला भीती वाटते. साधनेत सातत्य रहाण्यासाठी मी कसे प्रयत्न करू ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधनेत सातत्य नसेल, तर अ १, अ २, अ ३, आ १, आ २, इ १ आणि इ २ या पद्धतींनुसार स्वयंसूचना घ्या. तुम्हाला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ठाऊक आहे. साधनेत सातत्य असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. मुळात ‘सातत्य नसणे’ या स्वभावदोषाचे संस्कार अंतर्मनावर असतात. त्यामुळे तुम्हाला मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर ‘अनियमितता योग्य नाही’, हे पटलेले असते. विशेषतः ईश्‍वरप्र्राप्ती होण्यासाठी १५, २० अथवा २५ वर्षे साधना करावी लागते. साधनेत सातत्य नसेल, तर ‘आध्यात्मिक प्रगती कशी होईल ?’, हा अडथळा दूर होण्यासाठी अ १ पद्धतीने स्वयंसूचना घ्या.

श्री. ट्रंग वेन : मला माझ्यातील अहंकार नष्ट करायचा आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : व्यक्तीमधील अहंकार विविध स्वरूपांत प्रकट होतो. या प्रत्येक प्रकटीकरणासाठी वेगळी स्वयंसूचना घ्यायला हवी. जीवनात थोडेफार यश मिळाले की, स्वतःचा अभिमान वाटू लागतो. ही तुम्ही त्या प्रसंगाला दिलेली प्रतिक्रिया आहे. त्याऐवजी ‘सर्व काही देवाच्या कृपेने घडत आहे’, असा विचार करायला हवा. अशा वेळी स्वतःचा अभिमान वाटण्याचा प्रश्‍नच येत नाही. केवळ अध्यात्माविषयी बोलणे आणि अभ्यास करणे पुरेसे नसते. तुम्हाला या कार्यशाळेत ‘स्वयंसूचना कशा घ्यायच्या ?’, हे शिकवले आहे. त्यानुसार पुढील काही मास नियमित स्वयंसूचना घ्या.

श्री. ट्रंग वेन : मला या जन्मात जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्ती मिळेल का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही ध्येय निश्‍चित केल्यास तुमचे प्रयत्न जलद गतीने होतील. असा विचार करा की, तुमच्यात १० स्वभावदोष आहेत. या मासात एक स्वभावदोष नष्ट करीन आणि पुढच्या मासात दुसरा स्वभावदोष नष्ट करीन, असे ध्येय ठेवून प्रयत्न केल्यास १० मासांत तुमचे सर्व स्वभावदोष न्यून होतील. त्यानंतर तुमची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होईल. एखाद्याला शरीर कमवायचे असते, तेव्हा त्याला स्वतःलाच व्यायाम करावा लागतो. त्याप्रमाणेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्हणजे मनाचा व्यायाम आहे. त्यामुळे मन सशक्त होईल आणि तुम्हाला साधना सहज अन् चांगल्या प्रकारे करता येईल. श्री. ट्रंग यांना वाईट शक्तींचा त्रास आहे का ?

सौ. श्‍वेता क्लार्क : त्यांना फारसा आध्यात्मिक त्रास नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही भाग्यवान आहात. ज्यांना वाईट शक्तींचा त्रास असतो, त्यांना वाईट शक्ती स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवू देत नाहीत. त्यामुळे त्यांना या शक्तींच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी बरीच वर्षे साधना करावी लागते अथवा एखाद्या आश्रमात रहावे लागते. जगभरातील ७० ते ८० टक्के साधकांना वाईट शक्ती त्रास देतात. काही साधकांना अल्प, काहींना मध्यम, तर उर्वरित सर्व साधकांना तीव्र स्वरूपाचा त्रास आहे. ज्या साधकांना वाईट शक्तींचा त्रास आहे, त्यांना पाहून घाबरायचे नाही. तुम्ही तुमच्या देशात परत गेल्यावर तेथे ज्यांना वाईट शक्तींचा त्रास आहे, त्यांना तुम्ही साहाय्य करायला हवे. नाही तर अध्यात्म शिकून काय उपयोग ?

(क्रमशः)

भाग १६. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/434235.html

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक