‘ऑनलाईन’ राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनात साधक अधिवक्त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हिंदूंच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणारी अधिवक्त्यांची संघटना हिंदु विधीज्ञ परिषद
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे रामनाथी (गोवा) येथे अधिवक्ता अधिवेशन घेणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे यावर्षी ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात सर्वांना ‘प्रतिवर्षाप्रमाणेच यावर्षीही अधिवेशन होत आहे’, असे जाणवून चैतन्य अन् आनंद यांची अनुभूती घेता आली. अधिवेशनाचे पहिले सत्र १४.६.२०२० या दिवशी, दुसरे सत्र १५.६.२०२० या दिवशी झाले आणि तिसरे सत्र प्रांतनिहाय वेगळे वेगळे घेतले. त्या वेळी काही साधक अधिवक्यांना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/433598.html
४. अधिवक्त्या (सौ.) मृणाल साखरे, पुणे
अ. ‘मी न्यायालयात जात नाही, तर मी विधीची (कायद्याविषयीची) सेवा कशी काय करणार ?’, असे मला सारखे वाटत होते; मात्र आता ‘मी काहीतरी करू शकते’, असा मला आत्मविश्वास वाटतो.
आ. प्रत्येक वेळी मला ‘मी एकटी काय करणार ?’, असे वाटत होते; पण जेव्हा अधिवक्त्या अस्मिता सोवनीताईंनी त्यांचे अनुभव सांगितले, तेव्हा ‘साधनेची जोड असेल, तर आपण कसे प्रयत्न करू शकतो ? समष्टी सेवेला व्यष्टी साधनेची जोड दिल्यामुळे आपल्याला कसा लाभ होतो ?’, हे माझ्या लक्षात आले.
इ. गणेशोत्सवाच्या वेळी पुण्यामध्ये पुष्कळ ठिकाणी गणेशमूर्ती दान घेतल्या जातात. ‘ते रोखायला हवे’, हे मला कळत होते; पण ‘ते कसे रोखावे ?’, हेच कळत नव्हते. मला या अधिवेशनातून त्यासाठी दिशा मिळाली आणि आता ‘मी हे धर्मकार्य करू शकेन’, असा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला.
ई. ‘एखाद्या धर्मविरोधी कार्याला एकत्र येऊन विरोध केल्याने किती लाभ होतो आणि त्यासाठी स्थानिक अधिवक्त्यांचे संघटन केले पाहिजे’, हेही माझ्या लक्षात आले.
उ. ‘माहितीचा अधिकार’ या कायद्याचा आपण कसा उपयोग करू शकतो आणि त्याचा आपल्याला कसा लाभ होतो ?’, हे लक्षात आले. त्यासाठी ‘त्याचा सखोल अभ्यास करायला हवा’, याची मला जाणीव झाली.’
५. अधिवक्त्या (सौ.) मेघना सुहास नलावडे, चिपळूण
अ. ‘कोविड १९’सारख्या अनाकलनीय आपत्तीमुळे प्रतीवर्षाप्रमाणे यावर्षीचे अधिवक्ता अधिवेशन होणे’, हे मला अशक्यच वाटत होते; मात्र प.पू. गुरुदेवांच्या कृपेने हे अधिवेशन ‘ऑनलाईन’ घेतल्यामुळे सर्वांनाच अधिवेशनाचा लाभ मिळाला. ‘ईश्वराचे कार्य कधीही थांबत नाही’, हे यातून शिकायला मिळाले.
आ. मला सूत्रसंचालनाविषयीची एक छोटी सेवा मिळाली होती. त्या अनुषंगाने माझे ‘सात्त्विक वेशभूषा कशी असावी ? शब्दांचे उच्चार कसे असावेत ?’ याविषयी चिंतन झाले. मला सेवेचे ध्वनीमुद्रण करून पाठवायचे होते; परंतु ‘तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यास मी न्यून पडत आहे’, असे मला जाणवले. ‘विहित कालावधीत सेवा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर रहायला हवे’, हे यातून मला शिकायला मिळाले.
इ. ‘हिंदु राष्ट्र्र येणे किती आवश्यक आहे ?’, हे अनेक अधिवक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर जाणवले. त्यांच्या मार्गदर्शनातून ‘सद्यःस्थिती पालटण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घेणे किती आवश्यक आहे ?’, याचीही मला जाणीव झाली.’
६. अधिवक्त्या (कु.) अदिती पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘अधिवेशन ‘ऑनलाईन’ घ्यायचे असल्यामुळे त्यातील तांत्रिक भागाचा अभ्यास करायचा होता. तेव्हा ‘हे अधिवेशन संपूर्ण भारतभरात होणार असून त्यामध्ये समाजातील प्रतिष्ठित अधिवक्तेही सहभागी असणार आहेत’, हे समजल्यावर आरंभी मनावर दडपण होते; परंतु गुरुकृपेने ‘तांत्रिक अभ्यास कधी झाला ?’, हे मला कळलेच नाही.
आ. ‘कोरोनाचे संकट असतांना अशा पद्धतीने अधिवक्त्यांचे संघटन होऊ शकणे’ हे केवळ आणि केवळ ईश्वराच्या कृपेने होऊ शकते’, याची जाणीव होऊन मला कृतज्ञता वाटली.’
७. अधिवक्ता अभय कुलकर्णी, पंढरपूर
‘या अधिवेशनात साधकांनी काही सेवा प्रथमच केल्या. त्यातून मला त्यांचा ‘श्री गुरूंविषयी असलेला भाव, आत्मविश्वास आणि क्षात्रवृत्ती’ अनुभवायला अन् शिकायला मिळाली. अधिवक्त्या अस्मिता सोवनीताईंनी न घाबरता आणि स्पष्टपणे विषय मांडला. त्यातून ‘अस्मिताताईंमधील हा गुण वाढला आहे’, असे लक्षात आले.’
८. अधिवक्त्या (सौ.) सुनंदा येवले, तळेगाव
‘अधिवेशनातील विषय वेगळे असल्याने काही विषय मला नव्याने समजले. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे सर्व विषय अतिशय प्रभावी होते. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनातून मला पुष्कळ शिकायला मिळाले.’
९. अधिवक्त्या (कु.) दीपा तिवाडी
९ अ. एरव्ही ‘समन्वयाची सेवा नको’, असे वाटणे; मात्र या अधिवेशनात समन्वयाची सेवा करतांना आनंद मिळणे : ‘अधिवेशनात समन्वयाच्या अनेक सेवा असतात; मात्र त्या सेवा करतांना ‘समोरचा कसा प्रतिसाद देईल ?’ या विचाराने ‘समन्वयाची सेवा नको’, असे वाटते; मात्र या वेळी ‘चित्रीकरण करणे, समितीच्या सेवकांना संपर्क करणे’ यांसारख्या अनेक सेवांचा समन्वय करतांना मनाच्या संघर्षावर मात करण्यातील आनंद मला घेता आला.
९ आ. सूत्रसंचालनाची संहिता सिद्ध करण्याची सेवा शिकता येणे : ‘ऑनलाईन’ अधिवेशनासाठी ‘सूत्रसंचालनाची संहिता सिद्ध करणे’, ही माझ्यासाठी नवीनच सेवा होती. पहिल्या अधिवेशनाच्या वेळी माझ्याकडून सूत्रसंचालनामध्ये अनेक त्रुटीही राहिल्या होत्या; मात्र एरव्हीप्रमाणे त्या विचारांमध्ये अडकून न रहाता ‘पुढील अधिवेशनात त्रुटी राहू नये’, यासाठी काय करता येईल ?’, अशी विचारप्रक्रिया झाली. वाराणसी येथे यापूर्वी झालेल्या अधिवेशनात सूत्रसंचालन आणि एकूणच प्रस्तुतीकरण चांगले झाले. त्यातून मला शिकता आले आणि पुढील अधिवेशनामध्ये तसे पालट करता आले.
९ इ. अधिवेशनात अधिवक्त्यांचा चांगला सहभाग असणे : अधिवेशनात धर्मप्रेमी अधिवक्त्यांचा चांगला सहभाग होता. ‘वेब सिरीज’च्या माध्यमातून अश्लीलता पसरवणे आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचे हनन’ या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्वच अधिवक्त्यांकडून चांगला प्रतिसाद होता. एका अधिवक्त्यांची १२० जणांची संघटना असून त्यांनी ‘आम्ही याविषयी कार्य करू’, असे आम्हाला सांगितले. अधिवक्ता सुभाष झा यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करण्याची तळमळ जाणवली. ‘त्यांनी न्यायालयाचे कामकाज ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे चालवणे’ ही काळाची आवश्यकता आहे’, याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.’
१०. अधिवक्ता नीलेश सांगोलकर, पंढरपूर
१० अ. ‘गुरुमाऊलीच्या कृपेनेच अधिवेशन व्यवस्थित होणार आहे’, अशी श्रद्धा निर्माण झाल्यामुळे ताणविरहित अवस्था अनुभवणे : ‘अधिवेशन ‘ऑनलाईन’ घ्यायचे आहे’, हा निरोप मिळाला. त्या वेळी ‘देवच सर्व करणार आहे. आपण केवळ सर्व गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे. अधिवेशन गुरुमाऊलीच्या कृपेने व्यवस्थित होणार आहे’, अशी ठाम श्रद्धा अंतरात निर्माण झाली होती. त्यामुळे या वेळी मला वेगळेच जाणवत होते. माझ्या मनावर कसलाही ताण नव्हता.
१० आ. ‘अधिवेशनातील अधिवक्ते गुरुमाऊलीवरील श्रद्धेमुळे जोडले गेले आहेत’, याची जाणीव होणे : आजपर्यंत झालेल्या अधिवेशनांतून देवाने मला ‘अधिवेशनात जोडलेल्या अधिवक्त्यांना त्यांच्या कार्याच्या दृष्टीने जे द्यायचे आहे, ते पूर्ण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे’, हे शिकवले. ‘अधिवेशनात जोडलेले अधिवक्ते मुख्यत्वे त्यांची गुरुमाऊलीवर असलेली श्रद्धा आणि त्यांच्यातील चैतन्य यांमुळेच जोडले गेले आहेत’, हे मला विशेषत्वाने जाणवले.
१० इ. ज्येष्ठ अधिवक्त्यांकडून शिकता येऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे : ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशनाचे आयोजन गुरुमाऊलीने माझ्यासाठीच केले आहे’, असे मला जाणवले. साधकांमध्ये काही ज्येष्ठ अधिवक्ते असून ‘त्यांच्या बोलण्यात असलेली नम्रता आणि त्यांनी किती प्रेमाने सर्वांना जोडून ठेवले आहे ?’, हे शिकायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून देवाने मला ‘साधनेतील साहाय्यक देवदूत दिले आहेत’, असे जाणवून मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली आणि गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
१० ई. आलेल्या अनुभूती
१० ई १. अधिवेशनाची रूपरेषा बनवतांना कृतज्ञताभाव ठेवल्यामुळे रूपरेषेत गुरुमाऊली, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे चरणकमल अन् तोंडवळा यांचे दर्शन होणे : आरंभी अधिवेशनाची रूपरेषा बनवतांना ‘देवाला काय अपेक्षित आहे ?’, असा विचार करून ‘तशी कृती करायला हवी’, याची जाणीव होऊन ‘कृतज्ञेतेनेच सेवेचा आरंभ करूया’, असा विचार माझ्या मनात आला. गुरुमाऊलीने शिकवल्याप्रमाणे मी केवळ एक माध्यम सेवा म्हणून करत गेलो. प्रत्येक वेळी रूपरेषेत मला गुरुमाऊली, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे चरणकमल अन् तोंडवळा यांचे दर्शन होत होते.
१० ई २. ‘साक्षात् मारुतिरायाच दास्यभावाने अधिवेशनातील सर्व सेवा करवून घेत आहे’, असे जाणवणे : अधिवेशन आणि त्यातील सर्व सेवा वायुपुत्र हनुमंत करवून घेत आहे आणि त्याचाच अंकुश सर्व ठिकाणी आहे. साक्षात् मारुतिराया देवतांकडून हे सर्व करवून घेत आहेत’, असे मला जाणवले. मला त्यात त्याची दास्यभक्ती अनुभवता आली.
१० ई ३. ‘अधिवेशनाच्या ठिकाणी पांढर्या प्रकाशाचा गोळा कार्यरत आहे’, असे दिसणे आणि वेगवेगळे गंध अनुभवता येणे : अधिवेशनाला उपस्थित असलेल्या संतांच्या ठिकाणी मला पांढरा प्रकाश दिसत होता. ‘जणू प्रकाशाचा गोळाच त्या ठिकाणी कार्यरत आहे’, असे मला दिसत होते. त्या वेळी ‘गुरुमाऊलीच हे सर्व करवून घेत आहे’, असे मला जाणवले. प्रत्येक वेळी मला विविध प्रकारचे सुगंध अनुभवता आले.
१० ई ४. अधिवेशनाच्या तिसर्या सत्रात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी भाव जागृत होणे आणि त्यांचे दर्शन होताच आनंद अन् शांती यांची अनुभूती येणे : कर्नाटक आणि देहली येथील अधिवेशनाला संत अन् सद्गुरु यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. देहली येथील तृतीय सत्रात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन होणार होते. त्या वेळी ‘ईश्वराच्या सगुण रूपाचे दर्शन होणार’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. सद्गुरु पिंगळेकाकांचे दर्शन होताच माझ्या आनंदाचे प्रमाण वाढले आणि मला शांतीही अनुभवता आली.
१० ई ५. सद्गुरु पिंगळेकाकांच्या मार्गदर्शनातून चैतन्य प्रक्षेपित होत होते. प्रत्यक्षात काही तांत्रिक कारणामुळे तृतीय सत्र ३ वेळा ‘डिस्कनेक्ट’ झाले होते (दिसण्यात अडचणी आल्या होत्या); मात्र सदगुरु पिंगळेकाकांच्या मार्गदर्शनात कुठलाही अडथळा आला नाही.
१० ई ६. सद्गुरु पिंगळेकाकांच्या मागे वेगवेगळे प्रकाश स्पष्टपणे दिसत होते.
१० ई ७. त्यांच्या तोंडवळ्यावर आणि मागील बाजूस प्रभावळ दिसत होती. सगुण रूपातील ईश्वराचे दर्शन आणि त्याचे चैतन्य यांमुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली.
‘हे कृपाळू, विष्णुस्वरूप, मातृवत्सल गुरुदेव, या अधिवेशनाच्या माध्यमातून हे सर्व तुम्हीच मला अनुभवायला दिले. ‘तुम्हीच माझ्यात आपल्याला अपेक्षित असा दास्यभाव निर्माण करा’, अशी आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना आहे.’
११. अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे.
११ अ. अनुभूती – प्रांतीय अधिवक्ता अधिवेशनात अधिवक्ते बोलतांना ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावरील गुरुदेवांच्या छायाचित्रात वेगवेगळा प्रकाश दिसणे : ‘२५.७.२०२० या दिवशी झालेल्या अधिवेशनाच्या प्रांतीय सत्रात उत्तर महाराष्ट्रातील अधिवक्ते सहभागी झाले होते. त्या वेळी मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ घेऊन बसले होते. अधिवेशनातील अधिवक्ते बोलत असतांना मला मुखपृष्ठावरील प.पू. गुरुमाऊलीच्या छायाचित्रात वेगवेगळे प्रकाश दिसत होते. अशीच अनुभूती देवाने यापूर्वी मला मी रामनाथी आश्रमात झालेल्या प्रत्यक्ष अधिवेशनात सहभागी झाले असतांना दिली होती. ‘या आपत्काळातील ‘ऑनलाईन’ अधिवेशनातही देवाने मला रामनाथी आश्रमाचे चैतन्य घरीच अनुभवण्याची संधी दिली’, त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |