महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची कु. अपाला औंधकर हिने ‘नृत्यातील ‘पताक’ ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?’, याचा केलेला अभ्यास !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने ‘नृत्यातील ‘पताक’ ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?’, याचा केलेला अभ्यास !
‘नृत्यशास्त्रानुसार प्रत्येक मुद्रेला आध्यात्मिक अंग आहे. ‘या मुद्रा विविध प्रकारे केल्यावर आध्यात्मिक स्तरावर, म्हणजे ती मुद्रा केल्यावर मन अंतर्मुख झाल्यावर काय जाणवते ?’, याचा अभ्यास महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे नृत्याच्या माध्यमातून साधना करणारे साधक करत आहेत. हा अभ्यास करतांना प्रत्येक व्यक्तीला येणारे अनुभव त्याच्या आध्यात्मिक स्थितीनुसार उदा. आध्यात्मिक पातळी, सूक्ष्मातील कळण्याची क्षमता इत्यादीनुसार वेगवेगळे असतात. साधकाची साधना जसजशी वाढत जाते, तसतसे त्याला सूक्ष्मातील अधिक आकलन होऊन त्याचा पुढच्या स्तराचा अभ्यास होत असतो. नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. मुद्रा आणि हस्तमुद्रा यांचा अर्थ
१ अ. मुद्रा : संस्कृत भाषेत ‘मुद्’ या धातूला ‘रा’ हा प्रत्यय जोडून ‘मुद्रा’ हा शब्द बनला आहे. (मुद् (आनंद, आमोद) + रा (आदान करणे, देणे) = मुद्रा (आनंद देणे, शरिराला आकर्षक आकार देऊन आनंद देणे.) वैदिक ग्रंथात ‘मुद्रा’, म्हणजे हाताने केलेला संकेत.
१ आ. हस्तमुद्रा : नृत्यात हाताने केलेल्या मुद्रांना जणू काही नृत्याची भाषाच मानले आहे. हाताच्या मुद्रांना ‘हस्तमुद्रा’ असे म्हणतात. नृत्यामध्ये विविध हस्तमुद्रांचा वापर केला जातो. सखोल अभ्यास करून ऋषिमुनींनी या मुद्रा निश्चित केलेल्या आहेत.
२. कु. अपाला औंधकर हिने ‘पताक’ या हस्तमुद्रेचा पुढील सूत्रांच्या आधारे केलेला अभ्यास
अ. हाताची मुद्रा मूळ स्थितीत करून काय जाणवते ? (उदा. उजव्या हाताने मुद्रा करून तो उजव्या खांद्याच्या समोर धरणे, डाव्या हाताने मुद्रा करून तो डाव्या खांद्याच्या समोर धरणे)
आ. हाताची मुद्रा करून तळहात आकाशाच्या दिशेने केल्यावर काय जाणवते ?
इ. मुद्रा करून तळहात भूमीच्या दिशेने केल्यावर काय जाणवते ?
ई. हाताची मुद्रा करून शरिरातील सप्तचक्रांच्या ठिकाणांपासून १ – २ इंच अंतरावर धरल्यावर काय जाणवते ?
३. पताक हस्त
३ अ. मूळ स्थितीत पताक मुद्रा करणे
३ अ १. उजवा हात उजव्या खांद्याच्या समोर करणे
३ अ १ अ. २८ आणि २९.८.२०२० या दिवशी मला अनाहतचक्राच्या ठिकाणी दाब जाणवला.
३ अ १ आ. ३०.८.२०२० या दिवशी
१. ही मुद्रा केल्यावर २ – ३ मिनिटांनंतर मला आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवू लागल्या. १ – २ मिनिटांनी त्या ठिकाणी ५ – ७ सेकंद मला टोचल्यासारखे दुखू लागले. नंतर हात सामान्य स्थितीत खाली ठेवल्यावर मला हलक्या संवेदना जाणवल्या. ‘माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी काहीतरी आहे’, असे मला जाणवत होते.
२. मी ५ मिनिटांनंतर पुन्हा हाताची मुद्रा केल्यावर मला आज्ञाचक्राच्या ठिकाणी अत्यंत दाब जाणवू लागला. ‘आज्ञाचक्रावर काहीतरी जड ठेवले आहे’, असे मला जाणवले.
३. मला आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवत होत्या; पण ५ मिनिटांनंतर त्या न्यून झाल्या. नंतर मी शांतता अनुभवली आणि माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. मला श्री भवानीदेवीचे तत्त्व अनुभवायला मिळाले.
४. त्यानंतर मला श्री गणपतीचे दर्शन होऊन माझी भावजागृती झाली. त्याचे रूप पुष्कळ मनमोहक होते. ‘त्याच्या आशीर्वाद देणार्या हातातून सर्व साधकांना चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटले. यानंतर मला ५ – १० सेकंदांसाठी गुरुदेवांचे सुंदर रूप दिसले आणि माझा भाव जागृत झाला. तेव्हा मला श्री गणपतीचे तत्त्व अनुभवायला मिळाले. हे सर्व अनुभवत असतांना मला आज्ञाचक्राच्या ठिकाणी दाब जाणवत होता.
५. मला अभ्यास करतांना आनंद आणि शांतता जाणवली. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर मला आज्ञाचक्राच्या ठिकाणी दाब जाणवला नाही.
विश्लेषण : ‘या मुद्राभ्यासाच्या आरंभी कु. अपालावर थोडे आवरण असल्याने तिला दाब जाणवला; परंतु काही वेळ तिने त्या मुद्रेचा अभ्यास केल्यावर मुद्रांमधील चैतन्यामुळे तिला आध्यात्मिक लाभ झाला. त्यामुळे तिला असलेला थोडा आध्यात्मिक त्रास दूर होऊन शेवटी तिला दाब जाणवला नाही अन् तिला चांगल्या अनुभूती आल्या.’- कु. तेजल पात्रीकर ३ अ २. डावा हात डाव्या खांद्याच्या बाजूला करणे : काही जाणवले नाही.
३ आ. पताक मुद्रा करून तळहात आकाशाच्या दिशेने करणे
३ आ १. उजवा हात
अ. मला हातात कुंभ असलेल्या अन्नपूर्णादेवीचे दर्शन झाले.
आ. २ – ३ मिनिटे माझ्या पोटात जळजळ होत होती.
इ. माझ्या उजव्या हाताच्या मध्य भागातून वाफ अल्प प्रमाणात बाहेर पडत असल्याचे मला ५ – १० सेकंद जाणवले.
३ आ २. डावा हात
अ. ‘माझ्या डाव्या तळहाताच्या मध्यभागातून कोमट वाफा वरच्या दिशेने जात आहेत’, असे मला जाणवले. मला वाफांचा स्पर्शही जाणवला. मला ही अनुभूती २५ ते ३० सेकंद आली.
३ आ ३. सामायिक सूत्रे
अ. हा अभ्यास केल्यावर माझ्या दोन्ही हातांना पुष्कळ घाम येऊन माझे हात ओले झाले. (एरव्ही मी लिखाण करतांनाच हाताला घाम येतो. या वेळी मात्र पंखा चालू असूनही माझ्या दोन्ही हातांना घाम आला.) मला हात पुष्कळ चिकट वाटत होते.
आ. अभ्यासानंतर १० मिनिटांनी माझे हात अगदी कोरडे झाले.
– कु. अपाला औंधकर, रत्नागिरी (२७.११.२०२०)
कु. अपाला औंधकर हिने ‘नृत्यातील ‘अर्धपताक’ ही हस्तमुद्रा केल्यावर काय जाणवते ?’, याचा केलेला अभ्यास !
१. नृत्य करण्याआधी केलेला भावप्रयोग
मी नृत्य करण्याआधी ‘माझ्यासमोर परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप असून सर्व साधक त्यांना संपूर्ण शरण आले आहेत. अर्जुनाला जसे श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवले, त्याप्रमाणे गुरुदेव सर्व साधकांना श्रीविष्णु आणि त्याही पलीकडे श्रीविश्वदर्शनरूप दाखवत आहेत. माझ्यात तेवढी पात्रताच नाही; म्हणून मला त्या रूपाची केवळ रूपरेखा दिसत आहे. हळूहळू गुरुदेव ते रूप पहाण्याची शक्ती मला देत आहेत आणि हळूहळू त्यांचे तेजस्वी रूप मला दिसत आहे. गुरुदेवांचे विश्वदर्शन रूप पाहून सर्व साधक नतमस्तक झाले आहेत.
गुरुदेवांना पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘श्रीविष्णूने धृवबाळाला मांडीवर बसवले, त्याचप्रमाणे श्रीविष्णुरूपी गुरुमाऊलीने मला मांडीवर घेतले आहे’, हे आठवून माझ्या डोळ्यांत पुष्कळ भावाश्रू आले. मी कृतज्ञताभाव अनुभवत आहे. गुरुदेवांना पाहून साधक भावावस्थेत आहेत आणि त्यांच्या डोळ्यांतील भावाश्रू गुरुदेवांच्या चरणांवर पडत आहेत. माझी पुष्कळ भावजागृती होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली आणि मी क्षमायाचना केली.’ मी असा भावप्रयोग केला.
२. कु. अपाला औंधकर हिने मूळ स्थितीत ‘अर्धपताक’ या हस्तमुद्रेचा केलेला अभ्यास
२ अ. अर्धपताक हस्त उजव्या हाताने करून उजव्या खांद्यासमोर धरणे
१. मला या मुद्रेचा परिणाम मणिपूर चक्रावर जाणवला.
२. मला रूपाशी संबंधित अनुभूती आली.
३. मला शांती जाणवली
४. माझे काही क्षण ध्यान लागले.
५. मला कार्तिकेय देवतेच्या तत्त्वाची अनुभूती आली.
२ आ. अन्य अनुभूती
१. हा अभ्यास करतांना माझा ‘श्री विष्णवे नम: ।’ हा नामजप आपोआप चालू झाला.
२. मला मणिपूरचक्रावर ३ ते ४ सेकंद हलक्या संवेदना जाणवल्या.
३. मला कार्तिकेय देवतेचे रूप सलग दिसत होते. मला त्याच्या मागे हिमाच्छादित प्रदेश, म्हणजेच कैलास पर्वत दिसत होता. त्याचे रूप अतिशय तेजस्वी होते, तरीही माझा ‘श्री विष्णवे नम: ।’ हाच नामजप चालू होता.
४. मला पुष्कळ शांत वाटले आणि हस्तमुद्रा करतांना मी स्वत:ला विसरून गेले. ‘मी हस्तमुद्रा केली आहे’, हेही मला समजत नव्हते. मला सभोवतालचे कुठलेही आवाज येत नव्हते. माझे नामाकडे लक्ष केंद्रित होऊन काही क्षण माझे ध्यान लागले होते.’
– कु. अपाला औंधकर, रत्नागिरी (१०.९.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |