मंदिरात रहाणार्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय ? – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
नगर – केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला संवैधानिक आणि स्वायत्त दर्जा देणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला हमीभाव देणे यासंबंधीच्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत. यावर योग्य निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दोन वेळा दिले; मात्र लेखी आश्वासन पाळले नसल्याने आता जीवनातील शेवटचे उपोषण करायचे ठरवले आहे. त्यासाठी देहलीच्या रामलीला मैदानाची अनुमती मागितली आहे. मंदिरात रहाणार्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय ?, अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
या सर्व प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा, अशी विनंती भाजप नेत्यांनी हजारे यांना केली. हजारे यांच्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने ‘त्यांनी या वयात उपोषण करू नये’, असा आग्रहही त्यांनी धरला. केंद्रीय पातळीवर चर्चा करून अण्णांच्या मागण्यांसंबंधी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही खासदार डॉ. कराड यांनी सांगितले; मात्र शेतकर्यांच्या प्रश्नांवर देहलीत आंदोलन न करण्याची भाजपच्या शिष्टमंडळाची विनंती हजारे यांनी धुडकावून लावली आहे.