३१ डिसेंबरच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि पोलीस यांना निवेदन
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून अपप्रकार का रोखत नाही ?
सिंधुदुर्ग – पाश्चात्त्यांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे आपल्या देशातही गुढीपाडव्याऐवजी नववर्ष ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची प्रथा वाढीस लागली आहे. या कालावधीत घडणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
१. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रवींद्र परब, गजानन मुंज, डॉ. अशोक महिंद्रे अन् यशवंत परब यांनी निवेदन दिले. सावंतवाडी येथे पोलीस ठाणे अंमलदार श्रीमती राजलक्ष्मी राणे यांना हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री चंद्रकांत बिले, जीवन केसरकर आणि धर्माभिमानी श्री. सुनील पेडणेकर यांनी निवेदन दिले.
२. या निवेदनात म्हटले आहे की, ३१ डिसेंबरच्या रात्री युवकांमध्ये मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रात्रभर मोठ्या आवाजात फटाके लावून प्रदूषण केले जाते, तसेच ध्वनीवर्धकावर कर्णकर्कश आवाजात गाणी लावून त्यांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करून नृत्य केले जाते. तरुणींची छेडछाड करण्याच्या घटना घडून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांविषयी गंभीर स्थिती निर्माण होत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे, गड-किल्ले यांसारख्या ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करणे आणि मेजवान्या (पार्ट्या) करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा.
३. यावर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहेत. फटाके फोडल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढून श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत, तसेच ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर बंदी घालावी आणि कायदा-सुव्यवस्था राखावी.