‘ऑनलाईन’ राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनात साधक अधिवक्त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे रामनाथी (गोवा) येथे अधिवक्ता अधिवेशन घेणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे ‘यावर्षी अधिवक्ता अधिवेशन होणार किंवा नाही ? झाले, तरी कसे होणार ?’, असा साधक अधिवक्त्यांना प्रश्न होता; पण देवाचे कार्य कधी कशामुळे थांबत नसते. देवाने ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशन घ्यायचे सुचवून जणू त्याची अनुभूतीच सर्वत्रच्या अधिवक्त्यांना दिली. यामुळे सर्वच अधिवक्त्यांनी पुष्कळ उत्साहाने अधिवेशनाची सेवा केली. या अधिवेशनाचे स्वरूप नेहमीपेक्षा वेगळे असूनही कुणाचाही उत्साह रतीमात्रही न्यून झाला नव्हता. त्यासाठी आवश्यक असणार्या सर्व तांत्रिक गोष्टी बहुतेकांना नवीन असूनही त्यांनी त्या उत्साहाने शिकून घेतल्या आणि या अधिवेशनाचा आनंद घेतला.
हे अधिवेशन संपूर्ण भारतभरात होणार होते आणि त्यामध्ये समाजातील प्रतिष्ठित अधिवक्तेही सहभागी होणार होते. अनेक अधिवक्ते नव्याने काही सेवा शिकले, तर काहींना अधिवेशनात बोलायचा ताण न येता चांगल्या प्रकारे विषय मांडता आला. त्यामुळे सर्वांना ‘प्रतिवर्षाप्रमाणेच यावर्षीही अधिवेशन होत आहे’, असे जाणवून चैतन्य अन् आनंद यांची अनुभूती घेता आली. अधिवेशनाचे पहिले सत्र १४.६.२०२० या दिवशी, दुसरे सत्र १५.६.२०२० या दिवशी झाले आणि तिसरे सत्र प्रांतनिहाय वेगळे वेगळे घेतलेे. त्या वेळी काही साधक अधिवक्यांना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
(भाग १)
१. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
१ अ. प्रत्यक्ष अधिवेशनातील भाषणांमध्ये जाणवणारे चैतन्य अधिवेशनासाठी भाषण ध्वनीचित्रीत करतांनाही जाणवणे : ‘या वेळचे अधिवेशन ‘ऑनलाईन’ झाले. भाषण ध्वनीचित्रीत करून द्यावे लागले, तरी एरव्ही प्रत्यक्ष अधिवेशनात होणार्या कार्यक्रमांमधील भाषणांमध्ये जे चैतन्य जाणवते, तेच चैतन्य एखाद्या दूरच्या ठिकाणी बसून ध्वनीचित्रकासमोर (टी.व्ही. कॅमेर्यासमोर) भाषण ध्वनीचित्रीकरण करतांनाही जाणवत होते. त्या वेळी पुष्कळ आनंदही मिळत होता.’
२. अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली
२ अ. ‘ऑनलाईन’ अधिवेशनाचे तंत्र पूर्णपणे वेगळे असूनही ही सेवा करतांना पूर्वीपेक्षाही अधिक आनंद होणे : ‘काळानुसार साधना’ या तत्त्वानुसार कोरोना महामारीमुळे पहिल्यांदाच ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशन झाले. एरव्हीप्रमाणे ‘अधिवक्त्यांना समक्ष भेटणे, त्यांना विषय सांगणे’, असा कुठलाही भाग या अधिवेशनात नव्हता, तरीही पूर्वीच्या तुलनेत ही सेवा करत असतांना अधिक आनंद जाणवला. पूर्वनियोजन करतांना किंवा अडचणी सोडवतांना एक वेगळाच उत्साह जाणवत होता.
२ आ. ‘ऑनलाईन’ अधिवेशनाच्या निमित्ताने नवीन तांत्रिक गोष्टी शिकता येणे : मी ‘ऑनलाईन’ अधिवेशनाची रूपरेषा समजून घेतली. या अधिवेशनाच्या निमित्ताने मला अनेक नवीन तांत्रिक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातून ‘या सगळ्याचा वापर यशस्वीपणे करून आपण ‘ऑनलाईन’ शिबिरही घेऊ शकतो’, हे गुरुमाऊलीने शिकवले.
२ इ. ‘अध्यात्म हे स्थळ आणि काळ यांच्या पलीकडील शास्त्र आहे’, याची प्रचीती येणे : अधिवक्ता समीर पटवर्धन यांना कोल्हापूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा विषय मांडायचा होता. त्यांना अल्प कालावधीत ही सेवा पूर्ण करायची असूनही त्यांच्याकडून ही सेवा सहज पूर्ण झाली. यातून ‘अध्यात्मशास्त्र हे स्थळ आणि काळ यांच्या पलीकडचे शास्त्र आहे’, याची प्रचीती पुन्हा एकदा अधिवेशनाच्या माध्यमातून घेता आली.
२ ई. अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी यांचा अधिवेशनात विषय मांडण्याविषयीचा न्यूनगंड दूर होऊन त्यांना उत्तम प्रकारे विषय मांडता येणे : अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी यांनी त्यांचा विषय मांडला. त्या वेळी मला फार आनंद झाला. त्यांना ‘आपल्याला विषय मांडता येणार नाही’, असा न्यूनगंड होता. त्यामुळे यापूर्वीच्या अधिवेशनात त्यांचा सहभाग अल्प असायचा; मात्र या ‘ऑनलाईन’ अधिवेशनात त्यांना विषय मांडता आला’, तेव्हा ‘गुरुमाऊलींनी त्यांच्यामधील न्यूनगंड दूर केला’, असे मला जाणवले.
२ उ. ‘ऑनलाईन’ अधिवेशनात सहभागी झालेल्या अधिवक्त्यांचा प्रतिसाद ! : अधिवेशन झाल्यानंतर समाजातील अधिवक्त्यांनी स्वतःहून मला संपर्क करून रामनाथी आश्रमाविषयी विचारणा केली आणि ‘कार्याच्या दृष्टीने कसे सहभागी होऊ शकतो ?’, हेही विचारले.
२ ऊ. अनुभूती
२ ऊ १. ‘रामनाथी आश्रमातील चैतन्यमय वातावरणातच हे अधिवेशन चालू आहे’, असे अनुभवणे आणि गटचर्चेच्या वेळी प्रत्यक्षात समोर कुणीही नसतांना ‘अतिशय भावपूर्ण गटचर्चा झाली’, असे वाटणे : अधिवेशन चालू असतांना मला ‘मी घरात बसून ते ऐकत आहे’, असे वाटतच नव्हते. ‘मी रामनाथी आश्रमातच असून तेथील चैतन्यमय वातावरणातच हे अधिवेशन चालू आहे’, असेच मी अनुभवले. गटचर्चेच्या वेळी प्रत्यक्षात समोर कुणीही नसतांना ‘अतिशय भावपूर्ण गटचर्चा झाली’, असे मला वाटले. ‘या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सर्व अधिवक्ते पुन्हा एकदा एकमेकांना भेटलो’, याचाही आनंद मला झाला.
२ ऊ २. देवाच्या कृपेने ‘ऑनलाईन’ अधिवेशन चालू असतांना तांत्रिक अडचण न येता अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडले.’
३. अधिवक्त्या (सौ.) अमृता जुनघरे, पनवेल
३ अ. ‘या अधिवेशनाच्या सेवेच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले स्वभावदोष दूर करून गुणवृद्धी करवून घेणार आहेत’, असे वाटणे, सेवा करतांना सकारात्मक राहून प्रयत्न होणे आणि समाजात मनमोकळेपणाने अन् आत्मविश्वासाने बोलता येऊ लागणे : ‘ऑनलाईन’ अधिवेशनाच्या निमित्ताने मला काही सेवा आणि संपर्क करायला सांगितले होते. माझ्यासाठी ही सेवा नवीनच होती. मला वाटले, ‘या सेवेतून परम पूज्य मला घडवणार असून माझ्यातले स्वभावदोष घालवून गुण वृद्धींगत करणार आहेत.’ त्यामुळे सेवा करतांना माझ्याकडून सकारात्मक राहून प्रयत्न झाले. साधकांकडून मला प्रसंगावधान, समयसूचकता, सतर्कता, तारतम्य इत्यादी गुण शिकायला मिळाले. मला समाजात मनमोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने बोलता येऊ लागले.
३ आ. अधिवेशनात मांडलेले विषय हे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे असून ‘एक अधिवक्ता’ या दृष्टीने त्यांचा अभ्यास आणि त्याविषयी जागरूकता असली पाहिजे’, याची जाणीव होणे : ही सेवा करतांना ‘आपल्याला समाजामध्ये एखादी गोष्ट सांगायची असेल, तर ‘तिचे समाजापुढे एक प्रभावी चित्र उभे राहील’, अशी कशा पद्धतीने सांगायला पाहिजे ?’, हे मला शिकता आले. परम पूज्यांच्या कृपेने मी समष्टी सेवेत पहिले पाऊल टाकले आणि ‘पुढेही तेच मला घेऊन जाणार आहेत’, असे मला वाटले. अधिवेशनातील विषय ऐकतांना ‘एक अधिवक्ता’ या दृष्टीने या सर्व विषयांचा अभ्यास आणि जागरूकता असणे किती आवश्यक आहे ? समाजापर्यंत हे विषय पोचवून अज्ञानाचा अंधकार दूर होणे किती महत्त्वाचे आहे ?’, याचीही मला जाणीव झाली.’
(क्रमशः)
भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/433888.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |