ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे धर्मकार्य
पवित्र ते कुळ, पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ।
वारकरी संप्रदायातील पितामह, परखड वक्ते, धर्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु धर्मभूषण, धर्मभास्कर, साधकांचे मायबाप, महाराष्ट्र्रातील सर्व वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेले श्री गुरु ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांनी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी म्हणजे २१ डिसेंबर या दिवशी देह ठेवला. त्यांच्या चरणी शतशः नमन !
१. पूर्वायुष्य
ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९३४ या दिवशी खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे झाला. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी आजीसमवेत ६४ किलोमीटरची मुक्ताईची पायी वारी चालू केली. १२ ते १८ वर्षांपर्यंत त्यांनी गायींची सेवा केली. गायी चरत असतांना त्यांनी अडीच सहस्र अभंग पाठ केले. वर्ष १९५२ मध्ये श्री. विश्वनाथ पाटील यांची कन्या सुभद्रा हिच्यासमवेत त्यांचा विवाह झाला. त्यांना ३ मुले आणि २ कन्या झाल्या. पू. वक्ते महाराजांमध्ये अभियंते, अधिवक्ते, आधुनिक वैद्य, शास्त्रज्ञ, तज्ञ, समाजसुधारक, राज्यकर्ते यांना सल्ला देण्याचे सामर्थ्य होते.
२. अध्ययन आणि अध्यापन
वर्ष १९५४ ते १९५८ या काळात ते साखरे महाराज मठात आळंदी येथे राहिले. श्री गुरु नीलकंठ मोडक यांच्याकडे पू. वक्ते महाराजांनी अध्ययन केले. वर्ष १९५७ ते १९९२ या कालावधीत त्या काळातील थोर पंडित संत-महात्मे, ह.भ.प. परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारूरकर, गोपाळ शास्त्री आदी अनेकांकडे संस्कृत आणि प्राकृत प्रस्थानत्रयी, धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ, पुराण ग्रंथ यांचा पंढरपूर येथे अभ्यास केला. अध्ययन-अध्यापनाचे चातुर्मासामध्ये ६० वर्षांपासून कार्य चालू आहे. ४ मास पंढरपूर आणि ८ मास संपूर्ण महाराष्ट्रासह अन्य राज्यांत कीर्तन, प्रवचन, भागवत, रामायण कथा यांचे कार्यक्रम केले.
३. ह.भ.प. (पू.) वक्ते महाराजांनी केलेले धर्मकार्य
‘धर्माचे पालन करणे पाखंड खंडण ।’, हे त्यांच्या जीवनात घेतलेले व्रत आहे.
अ. ‘रीडल्स इन हिंदुइझम्’ आणि हिंदु धर्मावर केलेल्या सहस्रो आरोपांचे खंडण ‘रामायण भाष्या’मध्ये करून पू. वक्ते महाराजांनी जगावर मोठे उपकार केले आहेत.
आ. ‘संत तुकाराम महाराज खून कि वैकुंठगमन’ या पुस्तकाची शासनाकडे तक्रार करून सर्व आक्षेपांचे खंडण केले आणि ‘वादात हरलो, तर अग्निकाष्ठ भक्षण करीन’, अशी प्रतिज्ञा पू. वक्ते महाराजांनी केली.
इ. धर्मरक्षणार्थ श्रीक्षेत्र आळंदी येथे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन केले.
ई. प्रारंभीचा जादूटोणा विरोधी कायदा हा हिंदु धर्माविरुद्ध आहे, हे सिद्ध करून दिले आणि वारकर्यांमध्ये जनजागृती केली.
उ. श्रीराम सेतू सिद्ध ऐतिहासिक असल्याचे दाखले गोळा करून राष्ट्रपतींना पत्र पाठवले.
ऊ. महानुभव पंथियांनी लिहिलेल्या वारकरी संप्रदायाच्या अपकीर्तीजनक पुस्तकांचे खंडण लिहिले.
ए. अंनिसच्या हिंदु धर्माविरुद्धच्या ७ पुस्तकांचे एका साप्ताहिकामधून खंडण दिले.
ऐ. अंनिसचे गणपतीची मूर्ती दान घेणे आणि गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन अभियान उधळून लावले.
ओ. डाऊ आस्थापन हटवण्यासाठी आळंदी अधिवेशनात प्रथम निषेध ठराव मांडला.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यामध्ये अनेक शास्त्री, पंडित, धर्माचार्य, महामंडलेश्वर मुख्य होते. त्यांना वारकर्यांच्या वतीने २८ प्रश्न केले. पांढर्या वेशातील हे खरे संन्यासी आणि विद्वान असून ४ पिठांच्या शंकराचार्यांनी त्यांचा महावस्त्र आणि दक्षिणा देऊन सर्वांसमोर सन्मान केला होता.
४. ह.भ.प. (पू.) वक्ते महाराजांची ग्रंथसंपदा
विठ्ठलकवच, विठ्ठल हृदय, मुक्ताबाई चरित्र, ज्ञानेश्वर दिग्वीजय (ओवीबद्ध टीका) आदी पू. महाराजांच्या ग्रंथांतून मानवाला सदाचार, भक्ती, ज्ञान, धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम, स्वामीभक्ती यांचा प्रकाश मिळतो. त्यांच्या ऋणातून देशबांधव आणि धर्मानुरागी कधीच मुक्त होणार नाहीत.
५. पू. महाराजांच्या जीवनातील ईश्वरी कृपेची घटना
महाराजांना ज्ञानवर्धक ग्रंथ शिकण्याची आवड होती; पण ते कळत नव्हते. अचानक एकदा एक ब्राह्मण विठ्ठल मंदिरासमोर आला. त्याने गुरुवार करण्याचा उपदेश करून आशीर्वाद दिले. महाराजांनी त्याला विचारले, ‘‘आपण कुठे रहाता ?’’ तो म्हणाला की, मी २४ घंटे मंदिरात रहातो. नंतर महाराजांनी चौकशी केली; पण ते गृहस्थ भेटले नाहीत. विठ्ठलच त्या रूपात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
महाराजांच्या कार्याविषयी महाराष्ट्रातील तमाम भाविक, भक्त, वारकरी आणि सर्व संघटना यांच्या वतीने त्यांच्या चरणी कृतज्ञता ! आणि अनंत लोटांगणे !
– ह.भ.प. गोविंद महाराज हांडे, नगर