मळगाव ग्रामपंचायत प्रशासकावरील निलंबनाच्या कारवाईसाठी उपोषण करणार !
मळगाव ग्रामपंचायत प्रशासकावरील निलंबनाच्या कारवाईसाठी उपोषण करणार ! – मंगेश तळवणेकर, माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती, सिंधुदुर्ग
सावंतवाडी – तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतीवर नेमण्यात आलेले प्रशासक गणपत रामचंद्र लोंढे यांचा मनमानी कारभार चालू आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, यासाठी २९ डिसेंबर या दिवशी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार आहे, अशी चेतावणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली.
या निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले आहे की, मळगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक गणपत लोंढे यांचा मनमानी कारभार चालू असल्याविषयी अनेक तक्रारी आहेत. अलीकडे मळगाव गावातील शाळेतील मुलांच्या ‘ईबीसी’ अर्जावर स्वाक्षरी करण्यासही त्यांनी टाळाटाळ केली होती. तसेच त्यांना वेळोवेळी पाठीशी घातले जात आहे. त्यांच्या विषयीच्या अनेक तक्रारींची ध्वनीचित्रफीत सामाजिक माध्यमातून प्रसारित झाली आहे. शाळकरी मुलांची हानी करणार्या अशा मुजोर ग्रामपंचायत प्रशासकावर निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.