‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’कडून शासकीय अनुदानाचा अपलाभ घेतल्याची तक्रार !
पुरावे सादर करण्याविषयी सातारा नगरपालिकेने बजावली नोटीस
सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) – मुसलमान समाजातील मृत व्यक्तींच्या अनुदानामध्ये ‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’कडून वर्ष २०११ ते २०१८ या कालावधीत शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचा अपलाभ घेतला आहे. याविषयी ‘अॅक्शन कमिटी गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’ने सातारा नगरपालिकेकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची नोंद घेत सातारा नगरपालिकेने ‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’ला नोटीस बजावली आहे.
मृत मुसलमान समाजाच्या व्यक्तीसाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने अनुदान देण्यात येते. १५ फेब्रुवारी २०११ मध्ये तसा ठराव पालिकेच्या सभेत घेण्यात आला. तसे अनुदान वर्ष २०११ ते २०१८ पर्यंत ‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’ला देण्यात आले आहे; मात्र अनुदानाचा अपलाभ घेत असल्याची तक्रार आल्यानंतर पालिकेने ‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’ला नोटीस बजावली आहे.
नोटिसीच्या माध्यमातून १ एप्रिल २०११ पासून नगरपालिकेकडून मिळालेले अनुदान मृत व्यक्तींच्या वारसांना दिल्याविषयीची कागदपत्रे, संबंधित नातेवाईकांची नावे आणि पत्त्यांसह यादी तसेच इतर सबळ पुरावे ७ दिवसांत नगरपालिकेकडे सादर करावेत, असे आदेश न्यासाला देण्यात आले आहेत. याविषयी ‘अॅक्शन कमिटी गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’च्या विश्वस्तांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांची भेट घेऊन ‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’च्या विश्वस्तांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.