ऐतिहासिक ‘राजवाडा’ जतन करण्याची इतिहासप्रेमींकडून मागणी

नवीन राजवाडा

सातारा, २१ डिसेंबर (वार्ता.) – सातारा शहराच्या मध्यवस्तीत असणारा राजवाडा हिंदवी स्वराज्याच्या दैदीप्यमान आणि ऐतिहासिक परंपरेचा साक्षीदार आहे; मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे या ऐतिहासिक राजवाड्याची दूरवस्था झाली आहे. देखभाल-दुरुस्तीअभावी राजवाड्याच्या आतील भाग कोसळत असून याविषयी संबंधितांनी ठोस निर्णय घेऊन राजवाड्याची डागडुजी करून हा ऐतिहासिक ठेवा जतन करावा, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे.

वर्ष १८४४ मध्ये नवीन राजवाडा या वास्तूची निर्मिती झाली. त्या काळी अटक ते कटकपर्यंत पसरलेल्या हिंदवी स्वराज्याचा कारभार येथूनच चालत होता. पुढे वर्ष १८७६ मध्ये ब्रिटीश शासकांनी राजवाडा कह्यात घेत तेथे न्यायालय आणि इतर कार्यालये चालू केली. ती २० व्या शतकाच्या प्रारंभीपर्यंत चालू होती. विविध कामांसाठी माणसांचे जाणे-येणे चालू असल्यामुळे राजवाड्याचा डामडौल कायम होता; मात्र न्यायालय आणि कार्यालये येथून हालवल्यानंतर राजवाड्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता राजवाड्यातील एक-एक भाग ढासळू लागला आहे. खा. छ. उदयनराजे भोसले यांनी शासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही शासन याविषयी काहीच निर्णय घेत नसल्याचे समजते. त्यामुळे शासनाने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी संबंधित यंत्रणेला तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी इतिहासप्रेमी करत आहेत.