बजरंग सेनेचे अध्यक्ष पितांबर जाधव यांच्यावर पुन्हा आक्रमण
वाशीनाका (चेंबूर, मुंबई) येथील अनधिकृत मशिदीच्या विरोधात कायदेशीर लढा
|
मुंबई, २१ डिसेंबर (वार्ता.) – वाशीनाका (चेंबूर, मुंबई) येथील अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या ‘अल् मदिना’ या मशिदीच्या विरोधात कायदेशीर लढा देणारे बजरंग सेनेचे अध्यक्ष पितांबर जाधव यांच्यावर १२ नोव्हेंबर या दिवशी प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यामध्ये पितांबर जाधव यांचे छाती आणि पोट यांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. जाधव यांच्यावर तात्काळ उपचार झाल्यामुळे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे आक्रमण धर्मांधांनी केले असल्याचा आरोप जाधव यांनी केला असून याविषयी ‘आर्.सी.एफ्.’ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
याविषयी काही दिवसांपूर्वी ‘आर्.सी.एफ्.’ पोलीस ठाण्यात पितांबर जाधव यांचा जबाब लिहून घेण्यात आला; मात्र त्याची प्रत जेव्हा पितांबर जाधव यांना पाठवण्यात आली, त्या वेळी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पालट करण्यात आल्याचे आढळून आले. (लिहिलेला जवाब पोलीस ठाण्यात पालटला जात असेल, तर पोलिसांवर कुणाचा दबाव आहे ?, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक) याविषयी पितांबर जाधव यांनी ‘आर्.सी.एफ्.’ पोलीस ठाण्यात जाऊन पुन्हा जबाब नोंदवून घेण्यास सांगितले; मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित नसल्यामुळे जाधव यांना नंतर येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर १० डिसेंबर या दिवशी पितांबर जाधव यांनी स्वत:चा जबाब पुन्हा जबाब लिहून तो पोस्टाद्वारे ‘आर्.सी.एफ्.’ पोलीस ठाण्यात पाठवला. त्याची पोच जाधव यांना मिळाली असून त्यावर पुढील कार्यवाही व्हावी, यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. (अशा प्राणघातक आक्रमणाच्या प्रकरणात पोलिसांकडून अशा प्रकारच्या त्रुटी आणि दिरंगाई होत असेल, तर पोलीस यंत्रणेवर सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांचा कधीतरी आधार वाटेल का ? – संपादक) २१ डिसेंबर या दिवशी आर्.सी. एफ्. पोलीस ठाण्यात श्री. पितांबर जाधव यांचा जबाब पोलिसांनी लिहून घेतला. जबाब लिहून झाल्यावर तो पुन्हा श्री. जाधव यांना दाखवून पोलिसांनी तो अंतिम केला, अशी माहिती श्री. पितांबर जाधव यांनी दिली.
अनधिकृत मशिदीच्या विरोधात कारवाईसाठी प्रयत्न करत असल्यामुळेच माझ्यावर आक्रमण ! – पितांबर जाधव
हिंदुत्वाचे कार्य करत असल्यामुळे, तसेच सरदार वल्लभभाई पटेल नगर येथील ‘अल् मदिना’ ही मशीद अनधिकृत असल्याचे उघड केल्यामुळे आणि याविरोधात कारवाईसाठी पाठपुरावा करत असल्यामुळेच माझ्यावर हे प्राणघातक आक्रमण झाले आहे. येथील रफिक अन्सारी याच्याशी या प्रकरणी माझा वाद झाला आहे. त्याने त्याच्या हस्तकांद्वारे माझ्यावर आक्रमण केले आहे, असे पितांबर जाधव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
वर्ष २०११ मध्ये एक बांधकाम झोपटपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत तोडण्यात आले; मात्र काही कालावधीनंतर त्या ठिकाणी मशिदीचे बांधकाम करण्यात आले. याविषयी पिंताबर जाधव यांनी वर्ष २०१६ मध्ये इमारत प्रस्ताव विभाग, नवी मुंबई महानगरपालिका आणि चेंबूर येथील उपजिल्हाकार्यालय येथे माहितीच्या अधिकाराखाली मशिदीविषयी माहिती घेतली. त्यातून या मशिदीला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे अनुमती नसल्याचे आढळले. त्यानंतर पितांबर जाधव यांनी या अनधिकृत मशिदीच्या विरोधात ‘आर्.सी.एफ्.’ पोलीस ठाणे येथे तक्रार केली, तसेच संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये पत्रव्यवहारही केला. या कालावधीत वर्ष २०१५ मध्ये धर्मांधांनी पितांबर जाधव यांच्या घरावर आक्रमण केले. वर्ष २०१७ मध्येही पितांबर जाधव यांच्यावर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले होते. (अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण करण्याची मुजोरी धर्मांधांनी करणे, हा गेल्या ७३ वर्षांत शासकीय स्तरावरून केल्या जाणार्या लांगूलचालनाचा परिणाम आहे. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण होणे, ही पोलिसांसाठीही लाजीरवाणी गोष्ट आहे ! – संपादक) त्यानंतरही जाधव चिकाटीने या अनधिकृत मशिदीच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा करत आहेत.