कोरगाव (पेडणे) येथील श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव
पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील श्री भूमिकादेवीचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमी (२१.१२.२०२०) या दिवशी साजरा होत आहे. याविषयीची उपलब्ध माहिती येथे देत आहोत.
पेडणे तालुक्यातील कोरगाव हे शांत वातावरण असलेले, हिरवेगार, निसर्गरम्य गाव आहे. कोरगाव पंचायतीत अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक वाड्यावर लहान मंदिरे आहेत. श्री कमळेश्वर महारुद्र, श्री भूमिका, जैन, महालक्ष्मी साळेश्वर रघुगोण शेट, थोटो देवचार, मूळ भूमिका, नागगौडा, बांदेश्वर, भोगुर्ला, गोळ्या, ब्राह्मणदेवळी गावडेवाडा, ब्राह्मणदेवळी, भटवाडी, गडेराम पुरुष, वस, प्रयाग माधव, दाडेश्वर, जोगी देवस्थान, ब्राह्मण देवळी माडूण, या देवतांची मंदिरे आहेत. या देवतांपैकी श्री भूमिकादेवी ही नवसाला पावणारी ‘गोबराची आग’ म्हणून ओळखली जाते.
आख्यायिका
एकदा गावात आभाळ फाटल्याप्रमाणे धो धो पाऊस पडला. पावसामुळे पुराची स्थिती निर्माण झाली. काय करावे, या चिंतेत असलेले ग्रामस्थ श्री भूमिकादेवीच्या मंदिरात एकत्र जमले. गावातल्या एका वयस्कर व्यक्तीने देवीला साकडे घातले आणि म्हटले, ‘हे देवी, तू जर ‘गोबराची आग’ असशील, तर या पुरापासून ग्रामस्थांना वाचव.’ दोनच सेकंदांनी मंदिराची धड कोसळली आणि जमलेले पाणी एकदम नाहीसे झाले. पावसाच्या पाण्यामुळे होणारा घातपात टळला.
अशा प्रकारे ग्रामस्थांच्या हाकेला पावणार्या श्री भूमिकादेवीचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमी म्हणजेच ४ डिसेंबर या दिवशी मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यांतूनही अनेक भक्तगण या देवीच्या दर्शनाला येतात.
संकलक – देवीचा एक भक्त, कोरगाव, पेडणे, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |