अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद परमहंस भालचंद्र महाराज
॥ ॐ नमो भालचंद्राय ॥
भक्ताभि रामम् । तनुवस्त्र हीनम् ॥ सतेज नेत्रम् । कणकवली नाथम् ॥
अचल मौनरूपम् । वृत्ती परमहंसम् ॥ सद्गुरु भालचंद्रम्। शरणम् प्रपद्ये ॥
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली (कनकनगरी) येथील परमहंस भालचंद्र महाराज (उपाख्य भक्तांचे बाबा) यांचे स्वरूप नित्यशुद्ध, निराभास, निराकार, निरंजन असेच होते. ते ब्रह्मपदी लीन राहिल्याने अखिल चराचराशी तादात्म्य पावलेले होते. पराकोटीची विदेही स्थिती होती. तसेच ते अनंतकोटी ब्रह्मांडनायक होते. नेहमी विदेही अवस्थेत असलेले, भक्तांना दर्शन होताच त्यांच्या मनोकामना पूर्ण करणार्या परमहंस भालचंद्रबाबांचा ४३ वा पुण्यतिथी सोहळा २१ डिसेंबर २०२० ला कणकवली नगरीत साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी वाहिलेली शब्द सुमनांजली…
संकलक : श्री. रमेश ब. सावंत, कणकवली, सिंधुदुर्ग
वैराग्यमूर्ती परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्म, शिक्षण आणि संत सहवास
वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री. परशुराम ठाकुर आणि सौ. आनंदीबाई या मात्यापित्यांच्या पोटी ८ जानेवारी १९०४ या वर्षी परमहंस भालचंद्र महाराज (बाबा) यांचा जन्म झाला. तेथे ते शाळेत गेल्याचीही नोंद आहे. बाबांचे काही वर्षे जीवन मुंबईत गेले. लहानपणीच मातापित्यांचे देहावसान, मॅट्रीकच्या परीक्षेत आलेले अपयश, यांमुळे निराशा आलेल्या बाबांना अचानक वैराग्य प्राप्त झाले. त्या स्थितीत भालचंद्रबाबा एक दिवस गारगोटी, कोल्हापूर येथे गेले. तेथे गारगोटीचे एक साक्षात्कारी योगीपुरुष मुळे महाराज यांच्या सान्निध्यात आले. मुळे महाराजांनी बाबांना सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथे जाऊन तेथील संत प.पू. साटम महाराज यांची सेवा करण्यास सांगितले. त्यानुसार भालचंद्रबाबा दाणोलीत आले. तेथे प.पू. साटम महाराजांची सेवा केली.
परमहंस भालचंद्र महाराजांचे कणकवलीत आगमन
काही कालावधीनंतर भालचंद्रबाबा १९२६ या वर्षी कणकवलीत आले. प्रारंभी जुन्या वाहनतळावर (मोटारस्टँडवर) किंवा श्री काशीविश्वेश्वर मंदिरापाशी ते एकटेच बसलेले दिसत. कधी एखाद्या झाडाच्या बेचक्यात ते बसलेले असत. कुणाशी बोलत नसत, हसत बसत, काही दिले, तर घेत नसत. त्यांना काही खायला दिले, तर २-२ दिवस, तसेच पडून रहात असे. पुढे ते सहसा श्री काशीविश्वेश्वर मंदिरानजीकच्या प.पू. कामत महाराजांच्या समाधीच्या घुमटीत बसत असत. देहभान नसल्याने मलमूत्रविसर्जनही तेथेच करत असत. हाकलले तरी जात नसत. अखेर त्यांना समाधीमंदिराशेजारी एक घुमटी तयार करून त्यात बसवले. तेथेही तोच प्रकार चालू झाला. जाणारे, येणारे देवदर्शनास आलेले त्यांची घृणा करत; पण महाराजांनी हे निमूटपणे सहन केले. महाराजांचा कशालाच विरोध नसे, असे विलक्षण वैराग्य. ते सत्पुरुष आहेत याची जरासुद्धा कल्पना त्याकाळी लोकांना नव्हती. महाराजांच्या या अवस्थेमध्ये कोणा एका खोडसाळ माणसाने त्यांना उचलून शेणाच्या गायरीत (खड्डा खणून त्यामध्ये शेण टाकत रहातात, त्याला शेणाची गायर म्हणतात.) टाकले. तेथेही ते २ दिवस तसेच होते. बाबांची कुणी चेष्टामस्करी करत, कुणी उपहास करत; परंतु बाबांना त्याचे काहीही नसे. कोण विड्या, तर कोण सिगारेट देत असत. बाबा ते फुंकून टाकीत. त्यांचा धूर गिळत नसत, तर धुराचे लोटच्या लोट हवेत पसरवत असत.
परमहंस भालचंद्र महाराजांची लोक पूजा करू लागणे
परमहंस भालचंद्र महाराजांच्या देहाचे अशा प्रकारचे हाल दाणोली येथील प.पू. साटम महाराजांच्या कानी पडले. तेव्हा ते स्वत: २ वेळा कणकवली येथे आले आणि प.पू. भालचंद्र महाराजांना भेटले. प.पू. साटम महाराजांनी प.पू. भालचंद्र महाराजांची महती, आध्यात्मिक सामर्थ्य याची प्रचीती समाजास दाखवून दिली. २ महान योग्यांची भेट झाली आणि लोक भानावर आले. हळूहळू प.पू. भालचंद्र महाराजांना लोक नमस्कार करू लागले; पण खरी जनजागृती केली ती गारगोटी येथील श्री मुळे महाराजांनी. ते चहाचे व्यापारी होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचे फिरणे असायचे. कणकवली येथे आल्यावर प.पू. भालचंद्र महाराजांना त्यांनी ओळखले. त्यांनी महाराजांची महती सर्वांना सांगितली. त्यानंतर लोकांनी बाबांची पूजा करण्यास प्रारंभ केला.
परमहंस भालचंद्र महाराजांच्या चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली
धर्मराज महाराज, फलाहारी महाराज, प.पू. राज अहमद हुसेनशहा पटेलबाबा हे परमहंस भालचंद्र महाराजांचे शिष्य होते. परमहंस भालचंद्र महाराजांच्या ४१ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने बाबांच्या आठवणींचा हा जीवनपट भावपूर्णरित्या न्याहाळत असतांना जाणवते की, कणकवलीमध्ये या सत्पुरुषाचे आगमन झाले आणि त्या दिवसापासून कणकवली गावचे सर्व रूपच पालटले. बाबांना काहीजण वेडे समजत होते. एखादा ज्ञानी माणूस बाबांना ओळखून त्यांची पूजा करायचा. कुणी नमस्कार केला, तर त्याला चमत्कार बाबांनी दाखवला. अशा प्रकारे बाबांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली. जो जे मागेल ते बाबा त्यांना देत गेले.
बाबा समाधीस्त झाले !
लालबाग-मुंबई येथे श्री हनुमान मंदिरात १६ डिसेंबर १९७७ या दिवशी अखंड हरिनामचा जयघोष चालू होता. रात्री १०.२५ वाजता भक्तांना दर्शन देत असतांनाच बाबा अनंतात विलीन झाले. बाबांचे पार्थिव कणकवली येथे आणले गेले. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला (१८ डिसेंबर १९७७) सध्याच्या आश्रमातील मध्य गाभार्यात वेदमंत्रघोषात त्यांना समाधी देण्यात आली.