हरभरा उत्पादनवृद्धीचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करावे ! – मुकुंद म्हेत्रे
सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) – शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात हरभरासारख्या पिकासाठी उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. यामुळे हरभर्याचे उत्पन्न ३० ते ४० प्रतिशत वाढून शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वृद्धी होईल, असा विश्वास कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी व्यक्त केला. खटाव तालुक्यातील निढळ येथील नवनाथ खुस्पे यांच्या शेतात ‘हरितक्रांती फार्मस् प्रोड्युसर कंपनी’निर्मित फुले विक्रम या हरभरा जातीच्या बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाविषयी ते बोलत होते. या वेळी कृषी साहाय्यक नीलेश किरतकुडवे, सुनील शिंदे, शंकर दळवी, श्रीकांत खुस्पे आदी उपस्थित होते.
या वेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे म्हणाले की, शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे बियाणे स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यासाठी शेतकर्यांनी प्रत्येक हंगामात ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी स्वत: बियाणे सिद्ध केल्यास उत्पादन व्यय अल्प येऊन आर्थिक स्तर उंचावण्यास साहाय्य होईल. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांचेही मार्गदर्शन शेतकरी घेऊ शकतात.