पुणे येथे ‘प्लाझ्मा’ बॅगच्या किमतींमध्ये तफावत !
आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा त्रास रुग्णांना होतो. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रुग्णांची होणारी आर्थिक फसवणूक टाळावी !
पुणे – कोरोना संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील ‘प्लाझ्मा’चा घटक कोरोनाबाधिताला दिल्यास कोरोना आटोक्यात येत असल्याने रुग्णांना ‘प्लाझ्मा’ देण्याचा उपाय वापरला जात आहे. ‘प्लाझ्मा’च्या एका बॅगेसाठी सरकारने साडेपाच सहस्र रुपये दर निश्चित केला आहे; मात्र ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीने यासाठी ७ सहस्र रुपये आकारले असल्याने किमतीमध्ये तफावत आढळली आहे.
ससून रुग्णालय किंवा महापालिका, तसेच कोणत्याही सरकारी रुग्णालयात बाधित रुग्णास ‘प्लाझ्मा’ हवा असल्यास तो विनामूल्य देण्यात येतो; मात्र बाहेरील रुग्णाला प्लाझ्मा देण्यासाठी ७ सहस्र रुपये दर आकारण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसारच ‘ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीने सात सहस्र रुपये ‘प्लाझ्मा’साठी आकारले आहेत’, असे बी.जे. मेडिकल कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले. दुसरीकडे आरोग्य विभागाने २४ सप्टेंबरला काढलेल्या अध्यादेशात खासगी रक्तपेढ्यांना प्लाझ्मासाठी साडेपाच सहस्र रुपये दर आकारण्याचे आदेश जारी केले आहेत.