२६ डिसेंबरला शिवसेनेची सांगली-तुळजापूर १६ वी आशीर्वाद यात्रा ! – हरिदास पडळकर, शिवसेना

काही वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका यात्रेला निघतांना हरिदास पडळकर आणि अन्य

सांगली, २० डिसेंबर (वार्ता.) – शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विधानभवनावर झेंडा फडकू दे, अयोध्येत तात्काळ श्रीराम मंदिर व्हावे यांसह अन्य मागण्यांसाठी आम्ही गेली १५ वर्षे सांगली-तुळजापूर आशीर्वाद यात्रा (दुचाकी रॅली) काढत आहोत. देवी तुळजाभवानीला नवस केल्याप्रमाणे श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विधानभवनावर झेंडा फडकला, तसेच श्रीराम मंदिराचे स्वप्नही आता पूर्णत्वास जात आहे. यापुढील काळातही संसदेवर तिरंग्यासमवेत शिवसेनेचा भगवा फडकावा या मागणीसाठी आम्ही सांगली-तुळजापूर ही १६ वी आशीर्वाद यात्रा काढत आहोत. ही यात्रा २६ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता सांगली येथील शिवतीर्थ, मारुति चौक येथून प्रारंभ होईल, अशी माहिती या यात्रेचे प्रमुख निमंत्रक आणि शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर यांनी दिली.

श्री.  पडळकर म्हणाले, ‘‘या यात्रेसाठी प्रतिष्ठा फाऊंडेशनचे संस्थापक श्री. तानाजीराजे जाधव यांचे सहकार्य लाभत आहे. या कालावधीत आम्ही कृष्णामाईच्या पवित्र जलाने श्री भवानीदेवीला अभिषेक घालणार आहोत. यात्रेसाठी शिवसेना आमदार श्री. अनिल बाबर, जिल्हाप्रमुख श्री. संजयबापू विभूते आणि श्री. आनंदराव पवार यांसह अन्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी अधिकाधिक शिवसैनिकांनी या यात्रेत सहभागी व्हावे.’’