नेर्ली (जिल्हा सांगली) येथे आढळला सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा वीरगळलेख ! – मिरज इतिहास मंडळाचे संशोधन
मिरज – सांगली जिल्ह्यातील नेर्ली (तालुका कडेगाव) येथे सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा वीरगळलेख आढळला आहे. मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी हा लेख शोधला आहे. देवगिरीचा यादव राजा रामदेव याच्या काळातील हा लेख आहे. या वीरगळामुळे दक्षिण महाराष्ट्रातील यादव राजवटीवर प्रकाश पडणार आहे.
प्राचीन काळात एखादा वीरपुरुष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशिळा उभ्या करत. त्याला ‘वीरगळ’ म्हणतात. वीरगळ हे महाराष्ट्र्रात गावोगावी आढळतात. ज्या योद्ध्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत, त्याचे नाव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर, कोथळी आणि आगळगाव वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी शोधलेला आगळगावचा वीरगळ हा महाराष्ट्रातील सर्वांत प्राचीन असा वीरगळ लेख आहे.