किल्ले अजिंक्यतारा येथे १२ जानेवारी या दिवशी होणार सातारा नगरपालिकेची विशेष सभा
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची घोषणा
सातारा – स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहराची स्थापना छत्रपती शाहू महाराज यांनी केली. छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेकदिन म्हणजे १२ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि सातारा शहरात स्वाभिमानदिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीपासून प्रत्येक १२ जानेवारीला सातारा नगरपालिकेची विशेष सभा किल्ले अजिंक्यतारा येथील राजसदरेवर घेण्याची घोषणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
कोणत्याही किल्ल्यावर विशेष सभा घेण्याचा महाराष्ट्रातील पहिला मान राजधानीतील सातारा नगरपालिकेला मिळाला आहे. शिवराज्याभिषेकदिन उत्सव समितीच्या वतीने गत ८ वर्षांपासून १२ जानेवारी हा दिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला जातो. शहराची सीमावाढ झाल्यानंतर किल्ले अजिंक्यतारा शहराच्या सीमेत आल्यामुळे तांत्रिक अडचणी आपोआपच दूर झाल्या आहेत. त्यामुळे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हिंदुस्थानातील सर्वांत मोठा राज्यविस्तार राजधानी सातारा येथूनच !श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दूरदृष्टीने सातारा ही स्वराज्याची राजधानी सजवली. छत्रपती शाहू महाराज हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची सावली होते, असे वर्णन इतिहासामध्ये आढळते. अखंड हिंदुस्थान स्वराज्याच्या माध्यमातून एकसंध बांधण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराज यांनी केले. हिंदुस्थानातील सर्वांत मोठा राज्यविस्तार राजधानी सातारा येथूनच झाला. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेकदिन हा स्वाभिमानदिन म्हणून साजरा होत आहे. हळूहळू याची व्याप्ती वाढवून तो संपूर्ण भारतभर साजरा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा मानस खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. |