३१ डिसेंबर हा उत्सव नसून एक दिवसाचे धर्मांतरच होय ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच हिंदु नववर्षाच्या दिवशी ब्रह्मांडाची निर्मिती झाली. या काळात सृष्टीमध्ये पालट होतो. या दिवसाला धर्मशास्त्राचा आधार आहे. अनेक हिंदू ३१ डिसेंबर हा दिवस एखाद्या राष्ट्रीय किंवा धार्मिक उत्सवाप्रमाणे साजरा करतात. पाश्चात्त्यांनी त्यांच्या आर्थिक आणि राजकीय स्वार्थासाठी हिंदूंना हिंदु संस्कृतीपासून दूर करण्याचे षड्यंत्र रचून हिंदूंचा वैभवशाली वारसा नष्ट केला. धर्माचे पालन न केल्याने संकटांशी लढण्याची हिंदूंची मानसिकताच नष्ट झाली आहे. हिंदु धर्मातील सण, उत्सव आणि प्रत्येक कृती ही मनुष्याचे हित साधणारी आहे. धर्माचरण केल्याने सर्वांनाच लाभ होतो. आज कोरोना महामारीच्या निमित्ताने संपूर्ण जगाला हिंदु संस्कृतीचे महत्त्व समजले. त्यामुळे जग हिंदु संस्कृतीकडे आकृष्ट होत आहे. प्रत्येक हिंदूने धर्माचरण केले पाहिजे; कारण धर्मच आपल्याला योग्य विचार देतो, असे हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर येथे म्हणाले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ डिसेंबर या दिवशी पश्चिम मुंबई येथील हिंदुत्वनिष्ठांसाठी ३१ डिसेंबरच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात श्री. कोचरेकर बोलत होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नमिता सावंत यांनी केले. ‘या व्याख्यानातून उपयुक्त माहिती मिळाली’, असे उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले. हे व्याख्यान आयोजित करण्यात समितीच्या वतीने घेण्यात येणार्या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील युवकांनी पुढाकार घेतला होता.
३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन
नववर्षारंभाच्या निमित्ताने गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान आणि मेजवान्या केल्या जातात. अशा पद्धतीने नववर्ष साजरे करणे हे निंदनीय आहे. यावर प्रतिबंध करण्याचा आदेश काढण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे.