दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ वा वर्धापनदिन सोहळा
‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा झालेल्या सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदीमुळे प्रत्यक्ष कार्यक्रम घेता येण्याला मर्यादा असल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ वा वर्धापनदिन ‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा करण्यात आला. ‘सनातन प्रभात’ समूहाने प्रारंभापासूनच तत्त्वनिष्ठ पत्रकारितेचे व्रत अंगीकारले आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीतही विविध लेखमालिका, संपादकीय दृष्टीकोन, तसेच साधनेचे प्रयत्न आणि अनुभूती यांच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’ भांबावलेल्या समाजाला आधार देण्याचे कार्य करत आहेत.
१८ डिसेंबर २०२० या दिवशी झालेल्या वर्धापनदिन सोहळ्याच्या आरंभी सनातन पुरोहित पाठशाळेच्या पुरोहितांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ‘पतंजलि योग समिती’चे रत्नागिरी जिल्हा प्रभारी अधिवक्ता विद्यानंद जोग, सनातन प्रभात नियतकालिक समूह साहाय्यक संपादक श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी मनोगत व्यक्त केले.‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधी सौ. स्नेहा ताम्हनकर यांनी या सोहळ्याचे निवेदन केले.
समाजोद्धारक ‘सनातन प्रभात’चे कार्य विलक्षण आणि अद्वितीय ! – अधिवक्ता विद्यानंद जोग, जिल्हा प्रभारी, पतंजलि योग समिती, रत्नागिरी
भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली प्रसारमाध्यमे ही दुर्दैवाने परकीय लोकांच्या हातात गेल्यामुळे भारतीय समाजमनावर खूप मोठ्या प्रमाणात पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे विचार लादले गेले. त्यामुळे दुर्दैवाने हिंदु समाज राष्ट्रवादापासून दूर जाऊन पाश्चात्त्यांच्या अंधानुकरण करण्याचाच एक भाग बनला. त्यातच आपल्या हिंदु समाजाला धर्मशिक्षणाची सोय नाही. प्रसारमाध्यमांचे जे काम आहे, ते दुर्दैवाने भारतीय विचारसरणी असलेल्या किंवा त्या तत्त्वांवर आधारित असलेल्या एखाद्या संस्थेकडून केले गेले नाही; मात्र वर्ष १९९९ पासून ‘सनातन प्रभात’ चालू झाले, तेव्हापासून या कार्यामध्ये साधक आणि कार्यकर्ते जो वाटा उचलत आहेत, तो विलक्षण अन् अद्वितीय आहे. त्यासाठी त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. त्यांचे हे कार्य गेली २१ वर्षे अव्याहतपणे चालू आहे.
समाजात अव्याहतपणे जागृती करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे !
या देशात बहुसंख्य ८० टक्के हिंदु समाज असतांनाही हिंदूंच्या धार्मिक भावना सातत्याने दुखावण्याच्या घटना घडतात आणि त्यांना वाचा फोडणारे कोणतेही प्रसारमाध्यम नाही, ती जागा दैनिक ‘सनातन प्रभात’ने भरून काढली आहे. मंदिरांचे सरकारीकरण असो, ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘लॅण्ड जिहाद’ सारख्या घटना असोत, अशा विविध घटनांविषयी स्पष्टपणे आणि परखडपणे प्रसिद्धी देऊन समाजात अव्याहतपणे जागृती करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केलेले आहे.
प्रसारमाध्यमाने चांगला समाज घडवण्याचे कार्य करणे अपेक्षित असते. चांगला समाज हा चांगल्या सवयीतून घडतो. चांगल्या कृतीतून चांगल्या सवयी निर्माण होतात. चांगल्या कृती समाज कधी करतो ? तर विचार चांगले असतील तेव्हा. हे चांगले विचार कुठून येणार ? हेच कार्य लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून असलेल्या प्रसारमाध्यमांनी करणे अपेक्षित असते आणि तेच कार्य अतिशय प्रभावीपणे ‘सनातन प्रभात’ करत आहे. हिंदु धर्मावर आघात करणार्या अत्याचाराच्या, अन्यायकारक अशा कितीतरी घटना घडतात, त्यांना कुणी वाली नाही त्यांचे कुणी ऐकून घेत नाही, अशा परिस्थितीवर एक परिणामकारक व्यासपीठ ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून हिंदु समाजाला मिळाले.
हिंदु धर्माचे ज्ञान देणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ !
समाजाला धर्माचे ज्ञान देण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे करत आहे. एखाद्या घटनेविषयी चांगले आणि वाईट अन् समाजाने त्यातून काय दृष्टीकोन घ्यायला हवा, याविषयीचे मार्गदर्शनही दैनिकातून प्रभावीपणे मांडले जाते. हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य ‘सनातन प्रभात’चे आहे.
एका बाजूला आपत्काळाला लोकांनी कसे तोंड द्यावे, तर दुसर्या बाजूला शासनकर्त्यांनी कशा प्रकारे हिंदुहित जपले पाहिजे, परकियांचे वैचारिक, सांस्कृतिक आणि प्रत्यक्ष कृतीतून होणारे आक्रमण यांविषयी हिंदु समाजाला जागृत करण्यासाठी, धर्माचे अधिष्ठान असलेले हे एकमेव वृत्तपत्र ‘सनातन प्रभात’ आहे. हे वृत्तपत्र केवळ एखादा प्रश्न मांडून थांबलेले नाही, तर प्रश्न कशा प्रकारे सोडवता येईल आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी समाजाने काय करणे अपेक्षित आहे, हेही उत्तर ‘सनातन प्रभात’ देत असते.
कोणतेही कार्य ‘सेवा’ म्हणून करायला हवी, ही उच्च शिकवण !
आणखी एक वेगळेपण लक्षात आले, ते म्हणजे कुठलेही कार्य करायचे, तर ते सेवा म्हणून करावे आणि त्याकरता ईश्वराचे अधिष्ठान असल्याखेरीज ते तडीस जात नाही किंवा फळाला येत नाही, ही शिकवण साधकांनी आचरणात आणली आहे.
संपूर्ण जग पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असतांना आपला धर्म, धर्माचे श्रेष्ठत्व अतिशय खंबीरपणे समाजासमोर मांडणे, त्याचे ज्ञान समाजाला देणे, तसेच त्या ज्ञानावर धर्माचा पायाभूत विचार समाजात देणे आणि त्यातून एक प्रकारचा विश्वास निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन करून घेणे, याचसमवेत त्यांची आध्यात्मिक उन्नती कशी होईल, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणे, हे संपूर्ण विलक्षण कार्य ‘सनातन प्रभात’ आणि त्यांचे साधक कार्यकर्ते सातत्याने करत आहेत; म्हणून या कार्याला ईश्वरी अधिष्ठान आहे.
हे ईश्वरी कार्य अतिशय वेगाने पसरू दे. ‘सनातन प्रभात’ला परमेश्वराचा खूप मोठा आशीर्वाद मिळून आणि त्यांच्या हातून उत्तरोत्तर अधिक चांगल्या प्रकारे कार्य होऊ दे. यामुळे आपला भारत परम वैभवाला जाईल. तो आध्यात्मिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या चांगले विचार संपूर्ण जगाला देईल आणि त्यातून निर्माण होणारा समाज ‘सनातन प्रभात’सारख्या वृत्तपत्रांमुळे निर्माण होईल, यावर माझा विश्वास आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ दैनिक नसून ते एका सैनिकाप्रमाणे धर्मरक्षणाचे कार्य करणारे वृत्तपत्र ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती
दैनिक ‘सनातन प्रभात’चा २१ वा वर्धापनदिन सोहळा हा आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ हे अत्यंत कठीण परिस्थितीतून वर आले आहे. आर्थिक हानी सोसून चाललेले आणि हिंदुत्वाचा वसा घेऊन कार्य करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ज्या वेळी आपल्या सर्वांच्या घरी पोचते, त्या वेळी आपल्या सर्वांच्या मनामध्ये कृतज्ञताभाव असतो. हिंदु धर्मावर हिंदु संस्कृतीवर विविध प्रकारचे आघात होत आहेत. या आघातांना सामोरे जाण्याची संवेदनशीलता हिंदु समाजात फार अल्प प्रमाणात असल्याचे दिसते. याचे प्रमुख कारण म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव ! पूर्वीच्या काळी ऋषिमुनी, साधुसंत होते, जे हिंदु समाजाला सातत्याने धर्मशिक्षण देत; पण गेल्या २ ते ४ पिढ्या आपल्याला प्रत्यक्ष धर्मशिक्षण योग्य पद्धतीने मिळालेच नाही. दैनिक ‘सनातन प्रभात’ने ही न्यूनता भरून काढली आहे, असे मी निश्चितपणे म्हणू शकतो. एखादा धार्मिक सण आणि उत्सव यांविषयी हिंदूंच्या प्रथा परंपराविषयी धर्मशास्त्र काय सांगते ? हे धर्मशिक्षण केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचायला मिळते. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ दैनिक नाही, तर ते एका सैनिकाप्रमाणे धर्मरक्षणाचे कार्य करणारे वृत्तपत्र आहे.’
राष्ट्र आणि धर्म हानीच्या घटनांकडे कोणत्या दृष्टीकोनाने बघायला काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’मधून केले जाते. याविषयी उल्हासनगर येथे होणारे शीख बांधवांचे धर्मांतरण, मंदिर सरकारीकरण, ऑनलाईन वेब सिरीजच्या माध्यमातून होणारा भारतीय सैनिकांचा अवमान आणि ‘आश्रम’ या वेब सिरीजमधून होणारे साधूसंतांचे विडंबन या सर्वांसंदर्भात राष्ट्र अन् धर्म यांच्या हिताला धरून असणारा दृष्टीकोन दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वेळोवेळी दिला गेला. जेव्हा समाजामध्ये अधर्माने वागले जाते, त्या वेळी आपत्काळाच्या रूपात संकटे येतात. यासाठी समाजाला धर्माचरणी बनवले पाहिजे, ही भूमिका दैनिक ‘सनातन प्रभात’ने आग्रहाने मांडली. ‘आपत्काळ, कठीण काळ येणार’, हे सांगून दैनिक ‘सनातन प्रभात’ थांबले नाही, तर त्यासाठी शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर काय उपाययोजना करायला हवी, तेही सांगितले. आज दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे हिंदु समाज धर्महानी अन् राष्ट्रहानी यांच्या घटनांच्या विरोधात संघटित अन् कृतीशील झालेला दिसतो. दैनिक ‘सनातन प्रभात’ ज्ञानदृष्टी आणि धर्मदृष्टी देण्याचे कार्य करतो, असे नाही, तर हिंदु समाजाला जागृत करण्याचे कार्य ही तेवढ्याच प्रभावीपणे करत आहे.
आपत्काळात समाजाला तारून नेण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे योगदान मोठे ! – चेतन राजहंस, सहसंपादक, दैनिक सनातन प्रभात
१. ‘सनातन प्रभात’ हे वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्याप्रती नेहमीच कृतज्ञ राहील !
‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन म्हणजे आमच्यासाठी आमचे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मी अंतःकरणपूर्वक आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. केवळ आपल्या योगदानामुळे आम्ही राष्ट्र-धर्माचे कार्य अखंडपणे करू शकत आहोत. आपल्या सर्वांप्रती खरे तर कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे. ‘मागील अनेक वर्षे वर्धापनदिन दैनिकाचे वाचक, हितचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्या समवेत उत्साहात साजरा करण्यात येतो. या वेळी मात्र कोरोना महामारीमुळे हा सोहळा आपण ‘ऑनलाईन’ साजरा करत आहोत.
१ अ. वर्धापनदिन म्हणजे पुढील वर्षासाठी कार्याची दिशा ठरवण्याची संधी ! : सनातन प्रभात’चा वर्धापनदिन म्हणजे ‘वर्षभर ‘सनातन प्रभात’ने राष्ट्र-धर्म यांसाठी काय केले आणि येत्या वर्षातील ‘सनातन प्रभात’ची दिशा’, याच्या सिंहावलोकनाची संधी असते.
१ आ. ‘सनातन प्रभात’ने पूर्वी सांगितलेला आपत्काळ आता अनुभवायला मिळणे : गेली काही वर्षे ‘सनातन प्रभात’मध्ये एक संपादकीय टिप्पणी असायची की, ‘सनातन सांगतो, तो वाईट काळ हाच !’ त्याचसमवेत मागील अनेक वर्षे ‘सनातन प्रभात’मधून ‘पुढे आपत्काळ येणार आहे’, असे सांगितले जात होते. आज दळणवळण बंदीच्या काळात अनेकांनी ‘सनातन प्रभात’ने हे आधीच सांगितले होते. आज तो काळ आपण अनुभवत आहोत’, असे आवर्जून सांगितले. ‘सनातन प्रभात’ने केलेल्या काळाच्या संदर्भात केलेल्या जागृतीचा हा परिणाम आहे, असे आम्ही मानतो.
१ इ. चीनच्या कुरापतींविषयी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी १०-१२ वर्षांपूर्वी सांगितलेल्या सूत्रांवरून त्यांचा द्रष्टेपणा लक्षात येणे : सध्या भारताच्या सीमेवर तणाव आहे. गलवान वॅलीत चीनच्या कुरापतीनंतर भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले. चीनच्या कुरापती पहाता युद्धाचा भडका कधीही उडू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. मला वर्ष २००८ मधील एक घटना आठवते. त्या वेळी ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाली होती. मी ‘सनातन प्रभात’मध्ये सक्रीय असल्याने त्यांनी मला सहज विचारले, ‘आज काय बातमी ?’ मी म्हटले की, ‘सध्या चीन-भारत सीमेवर तणाव आहे.’ तेव्हा ते द्रष्टेपणाने म्हणाले, ‘‘तिसर्या विश्वयुद्धाला चीनच उत्तरदायी असेल. तो भारतावर प्रथम आक्रमण करील आणि नंतर पूर्ण विश्व या युद्धात उतरील.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘आता काही होणार नाही; पण भविष्यात १०-१२ वर्षांनी असेच घडेल.’’ आज १२ वर्षांनी त्यांच्या सत्यतेची अनुभूती घेत आहे.
२. काळाची पावले ओळखून त्यानुसार समाजमन घडवणारा ‘सनातन प्रभात’ !
अनेक वाचकांनी आम्हाला कळवले की, काळाची गती अचूकपणे ओळखणे आणि त्या संदर्भात वाचकांचा सतर्क करणे, ही ‘सनातन प्रभात’ची विशेषता आहे. असे अभिप्राय ऐकल्यानंतर वाचकांसाठी आम्ही काही करी करू शकलो, यातच आम्हाला आनंद आहे.
२ अ. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांचे विश्लेषण आणि त्यांवरील उपाय : जागतिक किंवा देशपातळीवरील घडामोडींविषयीच्या बातम्या सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसारित होतात; मात्र त्याचे विश्लेषण आणि समस्यांच्या निवारणासाठी भारताने करावयाच्या उपाययोजनांविषयी ‘सनातन प्रभात’मधून सांगितले जाते. ज्या काळात ‘चीनशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे भारताच्या हिताचे आहे’, असे राजकीय धुरिणांकडून सांगितले जात होते, त्या काळात ‘चीन भारताचा कसा शत्रू आहे आणि त्यामुळे भारताला किती मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते’, याविषयी ‘सनातन प्रभात’मध्ये वारंवार बातम्या, लेख यांच्या माध्यमातून सांगितले. आज असे चित्र आहे की, आपले शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळमधील साम्यवादी सरकार भारताच्या भूभागावर स्वतःचा हक्क सांगत आहे. नेपाळ शत्रूराष्ट्र असल्याचे आता म्हटले जात आहे. २८ मे २००८ मध्ये नेपाळमधील राजेशाही सरकार उलथवून तेथे निधर्मी राजवट लागू करण्यात आली. त्या वेळीच भारताला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, हे ‘सनातन प्रभात’मध्ये आपण १३ वर्षांपूर्वीच प्रसारित केले होते, तसेच ते पुन्हा हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे का आवश्यक आहे, याविषयी भाष्य केले होते.
२ आ. आपत्काळाविषयी जागृती ! : वर्ष १९९८-९९ पासून ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राचा उद्घोष करत आहे. ज्या काळात आधुनिकता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद यांचा उदोउदो केला जात होता, त्या काळात प्रवाहाच्या विरोधात जाऊन ‘सनातन प्रभात’ने ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि सेक्युलरवादामुळे भारताची झालेली हानी’ यांविषयी प्रबोधन केले. ‘हिंदु राष्ट्र वर्ष २०२३ ला येणारच आहे; मात्र त्याआधी आपल्याला भयानक अशा आपत्काळाला सामोरे जावे लागेल’ याविषयी ‘सनातन प्रभात’मधून वारंवार सांगितले गेले. या आपत्काळाची भयावहता लोकांना समजावी, यासाठी संतांनी केलेली भाकणूक, संतांनी आपत्काळाविषयी केलेले मार्गदर्शन प्रकाशित केले. त्याही पुढे जाऊन सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !’ ही लेखमालिका प्रसिद्ध केली. यात ‘आपत्काळ म्हणजे काय ?’, त्याची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता कशी करायची ?’, हे अगदी विस्तृतपणे सांगितले गेले. संत हे द्रष्टे असतात. परात्पर गुरुदेवांसारखे उच्च कोटीचे संत केवळ आपत्काळाविषयी सांगून थांबत नाहीत, तर पुढे जाऊन आपत्काळातून तरून जाण्यासाठी मार्गदर्शनही करतात त्याचा लाभ समाजासाठी व्हावा, या हेतूने ‘सनातन प्रभात’ कार्यरत आहे.
२ इ. कोरोना महामारीच्या काळात ‘सनातन प्रभात’ने केलेले कार्य ! : कोरोना महामारीच्या काळात लागू केलेली दळणवळण बंदी अपरिहार्य होती. या काळात उत्साही रहाण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी ‘कशात तरी मन गुंतवा’, ‘स्वतःचे छंद जोपासा’, अशा वरवरच्या उपाययोजना सांगण्यात आल्या. ‘सनातन प्रभात’मध्ये त्याही पुढे जाऊन या काळात मिळालेल्या वेळेचा राष्ट्र आणि धर्म यांसाठी सदुपयोग कसा करायचा, हे सांगण्यात आले. आपत्काळाच्या अनुषंगाने साधना करण्याचे महत्त्व बिंबवले. कोरोनामुळे जनतेमध्ये भीतीचे सावट असतांना ‘ही भीती कशी घालवायची’, ‘स्वयंसूचना कशा घ्यायच्या ?’ याविषयी मार्गदर्शन केले. यामुळे अनेकांना उभारी आली, तसेच साधना चालू केल्यामुळे काहींना अनुभूतीही आल्या. ‘समस्येवर वरवरची उपाययोजना नको, तर कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात’, या तत्त्वानुसार वरवरच्या सुखाऐवजी कुठल्या परिस्थितीत समस्थितीत रहाण्यासाठी काय करायला हवे, याविषयी दैनिकातून वेळोवेळी मार्गदर्शन केले.
२ ई. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागृती करणे : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर नागरिकांनी खबरदारी कशी घ्यावी, स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करायला हवे, तसेच आध्यात्मिक स्तरावर सक्षम होण्यासाठी नामजपादी उपायही ‘सनातन प्रभात’मधून सांगण्यात आले.
३. ‘प्रचंड खपाचे दैनिक’याऐवजी ‘दिशादर्शन करणारे दैनिक’ या ध्येयाने प्रेरित असणारे ‘सनातन प्रभात’ !
‘सध्या पत्रकारितेत ‘तत्त्वनिष्ठा’ किंवा ‘ध्येयनिष्ठा’ अभावानेच आढळते. अशा स्थितीत प्रचलित आणि प्रस्थापित ‘धर्मनिरपेक्षता’ किंवा ‘आधुनिकता या विचारसरणीला छेदून कुणाचीही भीडभाड न बाळगता हिंदुत्व आणि राष्ट्रहितार्थ भूमिका घेणे हे तितकेसे सोपे नाही; मात्र हे कठीण कार्य केवळ ईश्वर आणि संत यांचे आशीर्वाद यांमुळे ‘सनातन प्रभात’ला शक्य होत आहे. दळणवळण बंदीमुळे अनेक वृत्तपत्रांचे वितरण बंद आहे. तसेच काही आवृत्त्याही बंद आहेत. ‘सनातन प्रभात’च्याही काही आवृत्त्यांवर परिणाम झाला. वितरण ठप्प झाले, तरी समाजाला उपयोगी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोचेल, यासाठी ‘सनातन प्रभात’च्या अंकांच्या पीडीएफ् लोकांपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. आम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की, दळणवळण बंदीच्या काळात ५ लाखांहून अधिक लोकांपर्यंत ‘सनातन प्रभात’च्या अंकांच्या पीडीएफ् पोचवण्यात आल्या. व्यावसायिक हेतू न ठेवता समाजहितासाठी निरपेक्ष हेतूने कार्य करण्याच्या प्रेरणेमुळे हे शक्य झाले.
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध’ हे ‘सनातन प्रभात’चे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे ‘सनातन प्रभात’मध्ये हिंदूसंघटनाच्या अनुषंगाने बातम्या प्रसारित केल्यामुळे हिंदूंमध्ये किती प्रमाणात जागृती झाली’, ‘हिंदु धर्मावर होणार्या आघाताच्या विरोधात किती हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने कृती केली’, हे ‘सनातन प्रभात’साठी महत्त्वाचे आहे. हाच आमचा यशाचा निकष आहे. त्यामुळे ज्या ध्येयाने प्रेरित होऊन ‘सनातन प्रभात’ चालू झाले, त्या दिशेने आमची वाटचाल, नव्हे घोडदौड चालू आहे, हेच येथे मी सर्वांना सांगू इच्छितो.
४. तिसर्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल !
भावी काळ युद्धाचा आहे. सीमेपलीकडील युद्ध, वैश्विक युद्ध आणि त्याचसमवेत तिसरे महायुद्धही अनुभवावे लागेल. या काळात सर्वांना भारताची आंतरिक शक्ती म्हणून कार्य करण्याची संधी आहे. या काळातील आपले आचरण राष्ट्रभक्तासारखे असेल, तर भारताला त्याचा लाभ होईल. येणारा काळ विशेषतः २०२० ते २०२३ पर्यंतचा काळ अत्यंत वाईट आहे. या काळात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल. कदाचित् या काळात होणार्या युद्धांचा तो परिणाम असू शकेल. यासाठी आपल्याला मनाची सिद्धता करावी लागेल.
संतती होण्यापूर्वी प्रचंड प्रसववेदन सहन कराव्या लागतात, तसेच चांगला काळ येण्यासाठी आपल्याला वाईट काळ भोगावाच लागेल. वर्ष २०२३ नंतर हिंदु राष्ट्राचा पूरक काळ असणार आहे. तेव्हा भारत पुन्हा वैभवाच्या शिखरावर जाऊन विश्वगुरु म्हणून स्थापित होईल.
४ इ. ध्येयपूर्ती होईपर्यंत ‘सनातन प्रभात’ अखंडपणे कार्यरत राहील ! : ‘सनातन प्रभात’ हे ध्येयवादी दैनिक आहे. ज्या दिवशी भारतभूमीवर हिंदु राष्ट्राची पहाट उजाडेल, त्या दिवशी ‘सनातन प्रभात’ची ध्येयपूर्ती होईल. तोपर्यंत ‘सनातन प्रभात’ एकही सुट्टी न घेता ३६५ दिवस वैचारिक कार्य करत राहील, याचे वचन मी देतो. आपणही ‘सनातन प्रभात’ नियमित वाचन करा । त्यातील प्रबोधनाप्रमाणे आचरण करा । हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या परीने तन-मन-धनाने योगदान द्या । आपले योगदान आणि ईश्वराची अनंत कृपा यांमुळे आम्ही कार्य करू शकलो, यासाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक कृतज्ञता ! हिंदु राष्ट्राच्या पुढील कार्यासाठी आपले योगदान मागतो आणि भगवंताला प्रार्थना करतो की, हिंदु राष्ट्राचे महान कार्य आम्हा सर्वांकडून करवून घे !
लव्ह जिहादविषयीचे पहिले वृत्त ‘सनातन प्रभात’ने छापलेवर्ष २००८ मध्ये भारतभरातील विविध भागांत प्रवास करणार्या हिंदु जनजागृती समीतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रवासातील अनुभव ‘सनातन प्रभात’ला पाठवले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदु मुलींना पळवणे, त्यांचे अपहरण करणे, त्यांना खोट्या प्रेमात फसवून त्यांचे इस्लामीकरण करणे, अशा स्वरूपाचे हे सारे अनुभव होते. ‘सनातन प्रभात’ने या सर्व बातम्यांचे सार काढत एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली, ‘अशा घटनांमध्ये जिहाद आहे आणि या प्रेम जिहादापासून सावध रहा.’ आम्ही ही बातमी छापल्यानंतर ‘सनातन प्रभात’मध्ये याविषयी वाचकांकडून अनेक अनुभव येऊ लागले. त्यानंतर हिंदुत्वाच्या क्षेत्रातील दैनिक ‘सामना’, ‘तरुण भारत’ आणि अन्य वृत्तपत्रे यांनी अशा प्रकारच्या बातम्या छापण्यास आरंभ केला. हिंदु जनजागृती समितीने या सर्व बातम्या एकत्र करून ‘लव्ह जिहाद’चे एक ग्रंथ प्रकाशित केले. ११ भाषांत प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथाच्या ४ लाखांहून अधिक प्रती वितरित झाल्या. याच जागृतीचे फलित आज दिसत आहे. केरळच्या उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’विषयी केलेली टिपणी असो, उत्तरप्रदेश सरकारने केलेला लव्ह जिहादविषयी केलेला कायदा असो आणि मध्यप्रदेश, कर्नाटक ही राज्ये याविषयी कायदा बनवणार आहे, हा याच जागृतीचा परिणाम आहे. |
‘डेलिहंट’ या मोबाईल अॅपवर ‘सनातन प्रभात’ला ‘फॉलो’ करा !‘सनातन प्रभात’शी संबंधित एक शुभ वार्ता म्हणजे भ्रमणभाषवर ताज्या बातम्या प्रसिद्ध करणार्या ‘डेलिहंट’ मोबाईल अॅपवर ‘सनातन प्रभात’च्या बातम्या गेल्या मासापासून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या बातम्यांचे आता १ सहस्रहून अधिक ‘फॉलोअर’ झालेले आहेत. आपणही डेलिहंट या मोबाईल अॅपवर ‘सनातन प्रभात’ला फॉलो करावे, असे मी आवाहन करतो. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे ऑनलाईन ‘सनातन प्रभात’ची वाचकसंख्या आता ३ लाखांहून अधिक झाली आहे. ‘सनातन प्रभात’ केवळ वार्ता देणारे दैनिक नसून हिंदुत्वाची चळवळ चालवणारे दैनिक आहे. त्यामुळे एवढी वाचकसंख्या वृद्धी हा एक मोठा टप्पा आहे. |
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांनी पाठवलेले अभिप्राय
१. श्री. विनय पानवळकर यांनी केलेल्या सखोल मार्गदर्शनावरून ‘सनातन प्रभात’च्या कार्याने किती उंची गाठलेली आहे, हे अधोरेखित होते. – प.पू. उल्हासगिरी महाराज, ओणी-कोंडिवळे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’ केसरीसारखे समाजपरिवर्तन घडवून आणत आहे ! – श्री. उदय मुळ्ये, देवरुख
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २१ वा वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त सर्व वक्ते बोलत असतांना ‘सनातन प्रभात’चे द्रष्टेपण लक्षात येते. समाजातील विविध घटना परखडपणे छापून ‘केसरी’सारखे समाज परिवर्तन घडवून आणले जात आहे, त्याविषयी कोटी-कोटी धन्यवाद !
३. दैनिकामधील चैतन्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढते ! – सौ. श्रिया मंगेश साळवी, देवरुख
वर्धापनदिन सोहळ्यातील सर्व वक्त्यांचे मार्गदर्शन खूप आवडले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून आम्ही सनातनमध्ये सहभागी आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे; कारण या दैनिकामध्ये सर्व सत्य लिहिले जाते. दैनिकामधील चैतन्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढते, याचा अनुभव येतो.
४. दैनिक ‘सनातन प्रभात’ इतर दैनिकांपेक्षा वेगळे आहे, चैतन्यदावी आहे ! – सौ. नेहा नितीन सावंत, देवरुख
सर्वांचे मार्गदर्शन खूप आवडले. ‘सनातन प्रभात’मुळे समाजामध्ये जागृती झाली आहे. समाजातील अत्याचार या दैनिकामुळे उघडकीस येत आहेत. हे दैनिक इतर दैनिकांपेक्षा खूप चैतन्यदायी आहे.
५. ‘सनातन प्रभात’ म्हणजे सुस्थितीतील जीवनशैलीचे उगमस्थान ! – श्री. शशांक सूर्यकांत राजेशिर्के, कुडप, ता. चिपळूण
सुमारे १५ वर्षे मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. सनातन प्रभात म्हणजे ज्वलंत ‘हिंदुत्व’ होत. ‘सनातन प्रभात’ हे सुस्थितीतल्या जीवनशैलीचे उगमस्थान. सनातन प्रभात म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची पहाट’, अशा ‘सनातन प्रभात’चा वाचक होण्याची मला संधी लाभली. माझे आयुष्य कृतार्थ झाल्याची ग्वाही आहे. आजच्या युगामध्ये हिंदु धर्म लोप पावत असतांना हिंदु राष्ट्राच्या निर्मितीची जी मशाल ‘सनातन प्रभात’ने पेटवली आहे आणि आम्हा वाचकांसाठी अन् सर्व साधकांसाठी ती स्वप्नातील हिंदु राष्ट्राची पहाट भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेवांनी दाखवावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
६. दैनिक ‘सनातन प्रभात’ मुळे राष्ट्र, धर्म आणि समाज यांचा चांगला अभ्यास झाला – श्री. सुभाष राणे, कात्रादेवीचीवाडी, राजापूर
दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे राष्ट्र, धर्म आणि समाज यांचा चांगला अभ्यास झाला. त्यामुळे धर्मविषयक चर्चांमध्ये कुणाशीही सहजतेने बोलता येते.
विशेष
हा कार्यक्रम ‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आणि ‘यू ट्यूब’ यांद्वारे थेट प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम ६ सहस्र १२४ जणांनी प्रत्यक्ष पाहिला, तर कार्यक्रमाची लिंक २६ सहस्र ६२२ जणांपर्यंत पोचली (रिच).