ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला अखेर शासनाकडून टाळे
पणजी – उत्तर गोवा प्रशासनाने अखेर ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला टाळे ठोकले आहे. ‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा’ने या क्लबचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून ही कारवाई केली. ‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा’ने एका स्थानिक वृत्तपत्रातील वृत्ताची स्वेच्छानोंद (सुओमोटो) घेऊन ही कारवाई केली आहे.
‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या मते ‘सनबर्न बीच क्लब’ ओजरांत, हणजूण येथे ‘सी.आर्.झेड्.’चे उल्लंघन करून बांधण्यात आला आहे. हे बांधकाम करतांना समुद्रकिनारपट्टीवर जाणारा पारंपरिक रस्ता अडवला. या बांधकामामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. यासंबंधी ‘सनबर्न बीच क्लब’ला ७ जानेवारी २०२१ पर्यंत त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे.