जिल्हा पंचायतीचा पराभव एक आव्हान म्हणून स्वीकारणार ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते
मडगाव – जिल्हा पंचायतीत पक्षाचा झालेला पराभव आम्ही एक आव्हान मिळून स्वीकारत आहोत. गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळून आम्ही यापुढे गोमंतकियांना एक चांगले नेतृत्व देणार आहोत. काँग्रेस पक्षाने इतिहासात अनेक चढउतार पाहिलेले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आमच्या नेत्यांनी प्राणांचे बलीदान दिलेले आहे, असे मत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी येथे १८ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेला नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत पुढे म्हणाले, ‘‘गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पक्षाचे जिल्हा पंचायत सदस्य सदैव तत्पर असतील. भाजपच्या समाजात दुफळी माजवणार्या राजकारणाला गोमंतकियांनी बळी पडू नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने वर्षभराच्या कार्यक्रमासाठी १०० कोटी रुपये खर्च न करता ते आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वापरले पाहिजेत.
१९ डिसेंबर या दिवशी राष्ट्रपतींचा सन्मान राखण्यासाठी मी कार्यक्रमाला विरोधी पक्षनेता या नात्याने उपस्थित रहाणार आहे.’’
गोवा प्रदेशाध्यक्षपदाचे त्यागपत्र दिल्याच्या वृत्ताला गिरीश चोडणकर यांनी अखेर स्वत: दिला दुजोरा
जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या दारूण पराभवाचे दायित्व स्वीकारून गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिल्याची माहिती गिरीश चोडणकर यांनी दिली. आठवड्याच्या प्रारंभी हे त्यागपत्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांना सुपुर्द केल्याचे गिरीश चोडणकर पुढे म्हणाले. काँग्रेस पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीत केवळ चारच जागांवर विजय मिळवला आहे. यानंतर गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचे त्यागपत्र दिल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते; मात्र या वृत्ताची सत्यता जाणून घेण्यासाठी माध्यमांचा गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क होत नव्हता. अखेर १८ डिसेंबर या दिवशी गिरीश चोडणकर यांनी स्वत:च या वृत्ताला दुजोरा दिला.