नकारात्मकता पसरवणारे, फुटीरतावादी आणि अराष्ट्रीय शक्ती यांना गोव्यात थारा नाही !
गोवा मुक्तीदिन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची चेतावणी
पणजी, १९ डिसेंबर (वार्ता.) – नकारात्मकता पसरवणारे, फुटीरतावादी आणि अराष्ट्रीय शक्ती यांना राज्यात थारा दिला जाणार नाही, अशी चेतावणी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १९ डिसेंबरला गोवा मुक्तीदिनी दिली. येथील कांपाल मैदानात झालेल्या गोवा मुक्तीदिन सोहळ्याच्या वेळी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोमंतकियांना संबोधित करत होते. रेल्वेमार्ग दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरण आणि मोले वीजवहन प्रकल्प या राज्याच्या तिन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांना विरोध करणार्या शेकडो कार्यकर्त्यांनी दक्षिण गोव्यात आरोशी येथे १८ डिसेंबरच्या रात्री सुमारे १२ घंटे रेल्वेमार्ग अडवून धरला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही चेतावणी दिली. या सोहळ्याला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘राज्यशासन विकास प्रकल्प राबवतांना पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही आणि याचे संपूर्ण दायित्व मी घेत आहे. गोमंतकीय नागरिक जीवनात नेहमी आनंदी, सकारात्मक आणि आशावादी असतात. गोमंतकीय जनतेमध्ये नकारात्मकता, फुटीरतावाद आणि अराष्ट्रीय विचार यांना स्थान नसते. हे अनेक प्रसंगांतून अनेकवार उघड झालेले आहे. कोरोना महामारीच्या काळात गोवा शासनाने गोमंतकियांना मूलभूत सेवा, आरोग्यविषयक सेवा आदी पुरवण्यासमवेतच शेतकर्यांना साहाय्य करणे, वेळेत शाळांच्या परीक्षा घेणे आदी कृती केलेल्या आहेत. शासनाच्या या प्रामाणिक प्रयत्नांना जनतेने दाद दिली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीतून हे स्पष्ट झालेले आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेच्या अंतर्गत गोवा स्वयंपूर्ण बनवण्याचे ध्येय गोवा शासनाने ठेवले आहे. प्रत्येक पंचायतीने स्वयंपूर्ण बनण्याचे ध्येय ठेवल्यास गोवा राज्य स्वयंपूर्ण बनेल. दळणवळण बंदीच्या काळात परराज्यांतून आयात बंद झाली होती, तेव्हा येथील युवकांनी कृषी लागवड चालू केली आणि सर्वांसाठीच एक आदर्श घालून दिला. जनतेने सर्व मतभेद विसरून संघटितपणे गोव्याला एक स्वयंपूर्ण, आदर्श आणि विकसित राज्य बनवण्यासाठी प्रयत्न करावेत.’’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या भाषणात कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवेशी निगडित कर्मचार्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान, तसेच गोवा मुक्तीलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.