‘शिव-समर्थ’ शिल्प कुणाच्याही दबावाला बळी पडून हटवण्यात येऊ नये !
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांची प्रशासनाकडे मागणी
सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – राजवाडा बसस्थानक परिसरात नगरसेवक विजयकुमार काटवटे यांच्या प्रयत्नांतून आणि प्रशासनाच्या माध्यमातून ‘शिव-समर्थ’ शिल्प साकारण्यात आले आहे. या ऐतिहासिक शिल्पास काही समाजविघातक संघटना आणि व्यक्ती विरोध करत आहेत. प्रशासनाने कुणाच्याही दबावाला बळी न पडता हे शिल्प हटवू नये, अशी मागणी जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
१८ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीसमर्थ संप्रदायातील ज्येष्ठ समर्थभक्त पू. शहाजीबुवा रामदासी, नगरसेवक विजयकुमार काटवटे, नगरसेवक सुनील काळेकर, नगरसेविका प्राची शहाणे, अधिवक्ता शुभांगी काटवटे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री चंदन जाधव, संदीप जायगुडे, हिंदु महासभेचे उमेश गांधी यांसह ५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदनासमवेत राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे, गुरु-शिष्य परंपरा असल्याचे अनेक ऐतिहासिक अन् शासकीय पुरावे दाखवण्यात आले. भारत सरकारने प्रसिद्ध केलेले राजपत्र (गॅझेट) यांतीलही काही पुरावे निदर्शनास आणून देण्यात आले.