गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोनदिवसीय गोवा भेटीसाठी १९ डिसेंबर या दिवशी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता पणजी येथील आझाद मैदानातील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. या वेळी त्यांच्यासमवेत गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
- राज्यात कोळसा वाहतुकीला विरोध करणारे काही कार्यकर्ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद हुतात्मा स्मारकाला भेट देण्यास येण्यापूर्वी कार्यक्रमाला विरोध करण्याचा प्रयत्न करत होते. या कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी कह्यात घेतले. या कार्यकर्त्यांना गोवा मुक्तीदिन समारोह संपेपर्यंत पणजी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.
- गोवा मुक्तीदिन समारंभाच्या अनुषंगाने वाहतुकीत पालट करण्यात आल्याने पणजी शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे आढळले.
- नौसेनेच्या ‘आय.एन्.एस्.’ गोमंतक’ या विभागाने गोवा मुक्त करण्यासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली.
गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या गोमंतकियांना शुभेच्छा !पणजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दी सोहळ्याच्या निमित्ताने गोमंतकियांना शुभेच्छा देतांना ट्वीट करून म्हटले, ‘‘गोव्याला मुक्ती देण्यासाठी शौर्य दाखवत कठोर परिश्रम घेणार्यांना मी अभिवादन करतो. गोवा मुक्तीदिनी गोमंतकियांना शुभेच्छा ! आगामी काळात गोव्याची विकासाच्या दृष्टीेने वाटचाल होणार आहे, याविषयी दुमत नाही.’’
गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना शुभेच्छा देतांना गोवा आत्मनिर्भर बनवण्याच्या शासनाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, देहलीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल आणि अनेक राष्ट्रीय नेत्यांनी गोमंतकियांना शुभेच्छा दिल्या आहेत. |