कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तासगाव (जिल्हा सांगली) येथे महिला पोलीस नाईक विजयश्री विशाल मदने यांच्यावर गुन्हा नोंद
तासगाव (जिल्हा सांगली) – दीर्घकाळ कामावर अनुपस्थित राहून शासकीय कार्यालयीन कागदपत्रे, शासकीय कार्यालयात आणि न्यायालयात जमा न करता स्वतःच्या कह्यात ठेवल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक विजयश्री विशाल मदने यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी तक्रार दिली आहे.
मदने या १ फेब्रुवारी २०१७ पासून येथील पोलीस ठाण्यात नेमणुकीस होत्या. त्यांना येथील शहर ‘बीट’मध्ये नेमणूक दिली होती. १२ सप्टेंबरपासून त्या येथील पोलीस ठाण्यात अनुपस्थित आहेत. त्यांच्याकडे पोलीस ठाण्यातील ३४ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांची पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशाने तासगाव-पलूस पोलीस ठाण्यात स्थानांतर झाले आहे. तरीही २ डिसेंबरपर्यंत त्या तासगाव आणि पलूस पोलीस ठाण्यात उपस्थित राहिल्याच नाहीत. अन्वेषण अधिकारी म्हणून तक्रारदाराला न्याय देण्याच्या हेतूने कर्तव्यात कसूर करून आरोपीला साहाय्य करणे, महत्त्वाच्या न्यायालयीन कामकाजाच्या वेळी अनुपस्थित रहाणे, वरिष्ठांच्या कोणत्याही नोटिशीला उत्तर न देणे, लेखी आणि तोंडी आदेश देऊनही त्याचे पालन न करणे, न कळवता दीर्घकाळापर्यंत अनुपस्थित राहणे, विविध तपास विनाकारण प्रलंबित ठेवून या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर न करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत.