महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने आयोजित केलेल्या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

(भाग १२)

भाग ११ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/432560.html


२. वाईट शक्तींचा त्रास आणि त्या संदर्भात ठेवायचे दृष्टीकोन

२ इ. सकारात्मक वातावरणात साधना केल्याने वाईट शक्तींचा प्रभाव अल्प करण्यास साहाय्य होते !

सौ. रुची गोल्लामुडी : मी या पूर्वी अनेकदा गोवा (भारत) येथील आश्रमात आले आहे. त्या वेळी ‘मी येथे काय करत आहे ? हे साधक कोण आहेत ?’, हे मी विसरायचे. ‘तुम्ही येथे रहाता’, हेही मी पूर्णपणे विसरत असे; परंतु या वेळी मला तुमची दिवसभर आठवण येत असते. मला येथे प्रथमच शांत आणि आनंदी वाटत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : याचा अर्थ तुमचा आध्यात्मिक त्रास उणावला असून आनंदाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता तुम्हाला आश्रमात चांगले वाटते. पूर्वी तुम्हाला होणार्‍या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण जवळजवळ ७० टक्के होते. आता ते ३० टक्के आहे, म्हणजे तुमचा आध्यात्मिक त्रास अर्ध्याहून अधिक न्यून झाला आहे. तुमच्या साधनेमुळे हे शक्य झाले, हे सतत लक्षात ठेवा. काय गंमत आहे पहा ! तुम्हाला आध्यात्मिक त्रास होत होता, तेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलिया येथे होतात. आता तुम्हाला थोडे बरे वाटत आहे, तर तुम्ही आश्रमात येत आहात.

सौ. रुची गोल्लामुडी : प्रत्यक्षात मला येथे यायचेच नव्हते. आताही प्रतिदिन सकाळी उठून आश्रमात येण्यासाठी माझा संघर्ष होतो. मला आश्रमात यायचे नसते; परंतु येथे आल्यानंतर सायंकाळी मला घरी जायचे नसते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : रात्रीच्या वेळी वाईट शक्तींची आक्रमणे होतात. त्यामुळे सकाळी उठतांना तुमच्या मनात ‘आश्रमात जायला नको. घरीच राहूया’, असे विचार असतात; परंतु येथे (आश्रमात) आल्यानंतर येथील चैतन्य अनुभवल्यामुळे तुम्हाला ‘घरी परत जाऊ नये’, असे वाटते.

सौ. रुची गोल्लामुडी : आता मला केवळ साधनाच करायची आहे. मला पुन्हा पूर्वीच्या स्थितीला जायचे नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता भूतकाळाचा विचार नको. आतापर्यंत आपण अनेक जन्म वाया घालवले आहेत. या जन्मात तरी तुम्हाला साधनेचा योग्य मार्ग मिळाला आहे. (क्रमशः)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

भाग १३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/433251.html