सांगली महापालिका क्षेत्रात बेवारस वाहने उचलण्याची मोहीम
महापालिका क्षेत्रातील २२ हून अधिक वाहनांवर कारवाई
सांगली, १९ डिसेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून मनपा क्षेत्रात रस्त्यावर बेवारस स्थितीत पडून असणार्या बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई चालू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने तिन्ही शहरांत ही मोहीम जोरदारपणे राबवण्यात येत आहे. १९ डिसेंबर या दिवशी सांगलीतून १२, तर मिरज शहरातून १२ अशी २२ वाहने कह्यात घेण्यात आली.
महापालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर अनेक वर्षे वाहने पडून आहेत. यामुळे अस्वच्छतेसमवेत शहराचे विद्रूपीकरण होत आहे, तसेच रस्त्याला अडथळा सुद्धा निर्माण होत आहे. त्यामुळे अशी रस्त्यावर पडून असणारी सर्व वाहने उचलण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिल्यानंतर उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ डिसेंबरपासून रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.