पीओपी मूर्तींसाठी मंडळांसह मूर्तीकारांना बाजू मांडण्याची संधी

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर

मुंबई – केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपीच्या) मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंडळांची आणि मूर्तीकारांची बाजू ऐकण्यासाठी लवकरच एक समिती गठीत केली जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुंबईत दिले.

केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने घोषित केलेल्या नियमावलीच्या संदर्भात येणार्‍या अडचणींविषयी मुंबईतील विविध संघटनांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. या वेळी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्यासह बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती अध्यक्ष अ‍ॅड्. नरेश दहीबावकर, निखिल मोर्ये, महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिकात्मक चित्र

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या निर्णयानंतर केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने देशभरातील मूर्ती उत्सवांसाठी सुधारित नियमावली नुकतीच घोषित केली होती. या नियमावलीनुसार देशभरात पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा प्रदूषण नियामक मंडळाने केली होती. परिणामी मुंबईसह राज्यातील गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकार यांच्यासमोर समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या नियमांची कार्यवाही करतांना अनेक अडचणी येत असून मूर्तीकार आणि मंडळ यांची बाजू लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत या वेळी नरेश दहिबावकर यांनी व्यक्त केले होते.