ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिकप्रमुख मा.गो. वैद्य यांचे निधन

नागपूर – ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, पत्रकार असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचारप्रमुख माधव गोविंद तथा बाबूराव वैद्य (वय ९७ वर्षे) यांचे १९ डिसेंबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले. मा.गो. वैद्य यांची अंत्ययात्रा २० डिसेंबर या दिवशी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या प्रतापनगर येथील ‘विद्याविहार’ या निवासस्थानापासून निघणार आहे. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

मा.गो. वैद्य यांच्या पश्‍चात् पत्नी, ३ मुली, ५ मुलगे, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पुत्र डॉ. मनमोहन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह, तर सर्वश्री श्रीनिवास, शशिभूषण आणि डॉ. राम हे सहसंयोजक म्हणून दायित्व सांभाळतात.

ज्ञानसागर आणि ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व हरपले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ चिंतक, ज्येष्ठ संपादक, विचारवंत मा.गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनाने एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला आम्ही सारे मुकलो आहोत. त्यांच्या जाण्याने ज्ञानसागर आणि एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व हरपले. संस्कृत भाषेचे अगाध ज्ञान, कोणताही किचकट विषय सहज सोपा करून सांगण्याचे कसब, मराठी भाषा आणि व्याकरणावरील सिद्धहस्त लेखक अशी कितीतरी बिरूदे अपुरी पडतील इतके अथांग व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांच्याकडे समाजमन पहात असे. केवळ संघसेवा नव्हे; तर संघविचार रुजवण्यासाठी ज्यांनी स्वत:चे संपूर्ण आयुष्य वेचले, त्यासाठी हालअपेष्टाही सहन केल्या. त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कधीही भरून न निघणारीच अशीच आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.