आरक्षणाचा अधिकार असणारे गुणवान उमेदवार खुल्या प्रवर्गातूनही पदासाठी अर्ज करू शकतात ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी देहली – नोकरीमध्ये पद भरण्यासाठी उमेदवारांच्या जातींऐवजी त्यांच्या योग्यतेकडे लक्ष दिले पाहिजे आणि गुणवत्ता असणार्या उमेदवारांना साहाय्य केले पाहिजे. कोणत्याही स्पर्धेमध्ये नेहमीच योग्यतेवरच उमेदवाराची निवड झाली पाहिजे. आरक्षणाचा अधिकार असणारे गुणवान उमेदवार खुल्या प्रवर्गातूनही पदासाठी अर्ज करू शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाविषयीच्या एका याचिकेवर दिला. यामुळे आता कुठल्याही जातीचा उमेदवार खुल्या प्रवर्गातूनही अर्ज करू शकतो.
न्यायालयाने या वेळी म्हटले की,
१. एखाद्या उमेदवारामध्ये गुणवत्ता असेल, तर त्याने आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला पाहिजे. आरक्षण म्हणजे गुणवत्ता नाकारणे, असे नाही.
२. आरक्षण म्हणजे खुल्या वर्गासाठी असणार्या उमेदवारांना संधी नाकारण्याचा नियम होऊ नये. असे केल्याने जातीवर आधारित आरक्षण निर्माण होईल आणि प्रत्येक जात स्वतःच्या चौकटीत बंद होतील. त्यामुळे सर्वांसाठी खुले प्रवर्ग असले पाहिजे. यात एकच अट असली पाहिजे की, उमेदवाराला त्याची योग्यता दाखवण्याची संधी मिळावी. त्याला आरक्षणाचा लाभ उपलब्ध असला, तरी त्याने खुल्या प्रवर्गातून योग्यता दाखवावी.