वझरीवासियांचा मुक्तीसाठी लढा : मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपुर्द
पणजी – गोवामुक्तीचा हिरक महोत्सव साजरा होत आहे. पेडणे तालुक्यातील वझरी गाव मात्र अद्यापही मुक्त झालेला नाही. वझरी गावावर पोर्तुगीज काळापासून ‘कोर्ट रिसिव्हर’ नामक सालाझाराची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून वझरीवासियांना मुक्त करण्याचे आवाहन ‘वझरी शेतकरी नागरिक कृती समिती’ने केले आहे. या अनुषंगाने एक निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यात आल्याचे समितीने कळवले आहे.
गोवा मुक्तीच्या पूर्वी वर्ष १९४५ मध्ये वझरी गावात ‘कोर्ट रिसिव्हर’च्या विरोधात मोठे शेतकरी आंदोलन झाले होते. यानंतर गोवा मुक्त होऊन ५९ वर्षांचा कालावधी उलटला. वझरीचा संपूर्ण गाव ‘कोर्ट रिसिव्हर’च्या नावे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी लक्ष घालून वझरी गाव ‘कोर्ट रिसिव्हर’च्या जाचातून मुक्त करावा, अशी मागणी ‘वझरी शेतकरी नागरिक कृती समिती’ने केली आहे.