विश्वविद्यालये आणि महाविद्यालये यांठिकाणी देशी गायीच्या पालनाचे महत्त्व शिकवण्यावर वेबिनारमध्ये चर्चा !
राष्ट्रीय कामधेनु आयोग, यू.जी.सी., ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आदी विभागांकडून वेबिनारचे आयोजन !
गोपालनाविषयी चर्चा अपेक्षित नसून त्याविषयी तात्काळ कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !
नवी देहली – नुकतेच राष्ट्रीय कामधेनु आयोग, यू.जी.सी., ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आदी विभागांच्या एका वेबिनारमध्ये देशी गाय पाळण्याविषयी चर्चा करण्यात आली. या वेबिनारमध्ये केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. देशी गाय पाळण्यामुळे होणारे लाभ पहाता आणि त्याचा पर्यावरण, समाज आणि आरोग्य यांवर होणारा चांगला प्रभाव पहाता देशातील प्रत्येक विश्वविद्यालये आणि महाविद्यालये यांठिकाणी कामधेनु पीठ स्थापन करण्यात येऊ शकते. तसेच बी.टेक आणि एम्.बीए अभ्यासक्रम शिकणार्या विद्यार्थ्यांनाही देशी गाय पाळण्याविषयी शिकवण्यात येऊ शकते.
१. राष्ट्रीय कामधेनु आयोगचे अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया यांनी या वेबिनारमध्ये म्हटले की, आपल्याला देशी गायीचे आरोग्य, सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व युवकांना सांगण्याची आवश्यकता आहे. सरकारने आता गाय आणि पंचगव्य यांची क्षमता शोधण्यास प्रारंभ केला आहे. यामुळेच आपल्या शिक्षणात या विषयीचा अभ्यास शिकवला जाणे आवश्यक आहे. तसेच यावर संशोधनही केले पाहिजे.
२. संजय धोत्रे म्हणाले की, आपला समाज पूर्वी गायीच्या लाभामुळे समृद्ध होता; मात्र विदेशी शासनकर्त्यांमुळे आपण ते विसरलो आहोत. आता वेळ आली आहे की, याला पुन्हा जागृत केले पाहिजे. जेव्हा काही विश्वविद्यालये आणि महाविद्यालये देशी गायीविषयी शिक्षण देणे चालू करतील, तेव्हा अन्य ही याचे अनुकरण करतील.