राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज
पणजी, १८ डिसेंबर (वार्ता.) – गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीनिमित्त आयोजित महासोहळा कार्यक्रमातील सायंकाळच्या सत्रात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत कांपाल मैदानात गोव्यातील कला, संस्कृती आणि इतिहास यांचे दर्शन घडवणारा ‘गोंयचो गाज’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी गोव्याचा इतिहास आणि मुक्तीसंग्राम यांवर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन होणार आहे, तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मर्यादित मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आल्याने या कार्यकमाचे संपूर्ण गोमंतकियांसाठी सर्व वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Greetings to all Goans on the occasion of Goa Liberation Day! #MyGoa60 #GoaAt60https://t.co/A38PawD07x
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) December 18, 2020
पोलीस अधिकारी आणि अग्नीशमन दलाचे जवान यांना सन्मानित करणार
गोवा मुक्तीदिनी ७ पोलीस अधिकार्यांना उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्री पोलीस (सुवर्ण) पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. गोवा अग्नीशमन दलाच्या ३ जवानांना ‘मुख्यमंत्री अग्निशमन दल सेवा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
गोवा मुक्तीदिन सोहळ्याच्या निमित्ताने पणजी शहराला छावणीचे स्वरूप
गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीनिमित्तच्या सोहळ्याच्या निमित्ताने पणजी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरात नाकानाक्यांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमामुळे शहरातील वाहतुकीत १९ डिसेंबर या दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून पालट करण्यात आला आहे.