छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोवा मुक्तीसाठी दिलेला लढा !
१९ डिसेंबर २०२० या दिवशी असलेल्या ‘गोवा मुक्ती’च्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने…
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि गोव्याचा संबंधच काय ?’, असा प्रश्न विचारणार्या गोव्यातील पोर्तुगीजधार्जिण्या लोकांसाठी हा लेखप्रपंच !
रामदासांच्या समर्थ वाणीने काष्ठवत झालेल्या जनमानसांत तेजाचे, चैतन्याचे स्फुल्लींग पेटवले. लोकजागृतीतून महाराष्ट्राला यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत असा ‘जाणता राजा’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला. या जाणत्या राजाने गोव्यात आदिलशाही आणि पोर्तुगीज यांच्याकडून नागरिकांवर होणार्या अत्याचारांतून त्यांना मुक्त करण्यासाठी आणि हिंदवी राज्य स्थापन करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनी गोवा मुक्त करण्यासाठी महाराजांनी दिलेल्या लढ्याचा वृत्तांत या लेखात आपण पाहूया !
म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे काम चालू असतांना काही पोर्तुगीजधार्जिण्या लोकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यासाठी काय केले ? त्यांचा गोव्याशी काय संबंध?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. ज्यांनी पोर्तुगिजांची ‘खा, प्या, मजा करा’, ही संस्कृती अवलंबली, त्यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास काय माहिती असणार ? त्यांच्यासाठी आणि येणार्या पिढीसाठी हा लेखप्रपंच !
गोव्यातील आदिलशाहीचे डिचोली आणि सांखळी प्रांत महाराजांनी कह्यात घेणे !
सन १६६१ मध्ये महाराजांनी डिचोली आणि सांखळी हे २ आदिलशाहीचे प्रांत कह्यात घेतले. त्यामुळे या २ प्रांतांत समाविष्ट झालेले पेडणे, मणेरी आणि सत्तरी या ३ महालांवरही महाराजांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा तर्हेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी राज्याची सीमा पोर्तुगिजांच्या बार्देश प्रांतास भिडली.
महाराजांनी फोंडा किल्ल्याला वेढा देणे आणि आदिलशाहीस पोर्तुगिजांनी साहाय्य केल्याने लढा उठवावा लागून डिचोली, सांखळी सोडावी लागणे !
वर्ष १६६६ च्या मार्च मासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही राज्यात समाविष्ट झालेल्या फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. किल्ल्यात सैन्य-शिबंदी बेताचीच होती. किल्ला महाराजांच्या कह्यात आला असता; पण पोर्तुगिजांनी नदीतून दुर्भाटवरून किल्ल्यात गुप्तपणे दारूगोळा आणि अन्नसामुग्रीची रसद पुरवली. त्यामुळे किल्लेदारास किल्ला लढवणे शक्य झाले. पुढे काही दिवसांनी विजापूरहून सरदार रुस्तुमजम्मा मोठे सैन्य घेऊन किल्लेदाराच्या साहाय्यास आला. त्यामुळे महाराजांना वेढा उठवणे भाग पडले, तसेच सांखळी आणि डिचोली हे दोन्ही प्रांत आदिलशाहीस सोडावे लागले.
पोर्तुगिजांनी फोंड्याच्या किल्लेदारास जे साहाय्य केले, त्याला तसेच विशेष कारण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि जिद्द पोर्तुगिजांना ज्ञात होती. महाराष्ट्रात हिंदुपदपातशाही स्थापन होत असल्याचे ते पहात होते. महाराजांच्या स्वतंत्र राज्याची सीमा बार्देशला भिडली होती. फोंडा महाराजांनी सर केला, तर पोर्तुगिजांच्या सासष्टीवरील अधिपत्याला सुरूंग लागेल, हे त्यांनी ओळखले होते. याखेरीज सक्तीच्या धर्मांतरामुळे आपल्या राज्यात धुमसणारा असंतोषाचा स्फोट होईल आणि महाराज आपल्या राज्यावर स्वारी करतील, ही भीती पोर्तुगिजांना वाटत होती; म्हणून त्यांनी महाराजांच्या विरुद्ध आदिलशाही किल्लेदारास साहाय्य केले. पोर्तुगिजांनी तहाची कलमे धाब्यावर बसवून आदिलशाही सैन्यास साहाय्य केल्याने फोंड्याचा वेढा आपणास उठवावा लागला आणि सांखळी अन् डिचोली हे दोन्ही प्रांत आपणास गमवावे लागले हे शल्य महाराजांच्या मनात सलत राहिले. त्याचप्रमाणे महाराजांच्या त्या पराभवास कुडाळचे लखम सावंतही कारणीभूत होते. त्यांनी रुस्तुमजम्मास महाराजांच्या विरुद्ध साहाय्य केले होते.
औरंगजेबाशी महाराजांनी तह करणे !
त्या वर्षी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंह आणि दिलेरखान या त्यांच्या सरदारांना सैन्यानिशी महाराजांची हिंदुपदपातशाहीची स्वप्ने धुळीस मिळवण्यास पाठवले. महाराजांनी त्यांच्याशी तह केला. आपले २३ किल्ले आणि ४ लाख होन उत्पनाचा मुलुख त्यांनी मोगलांच्या स्वाधीन केला. तहातील कलमाप्रमाणे ते औरंगजेबाच्या भेटीला आग्य्राला गेले असतांना औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले; पण तेथून ते हुशारीने निसटले आणि वेशांतर करून आपल्या जिवलग सरदारांसह स्वराज्यात रायगडवर परतले.
आग्य्राहून परतल्यावर महाराजांनी डिचोली आणि सांखळी प्रांत पुन्हा कह्यात घेणे !
आग्य्राहून महाराज परतले ते एक निश्चय पक्का मनाशी करून आणि त्यांनी स्वराज्याचा पाया भक्कम करण्याचा चंग बांधला. त्यांनी आदिलशाही प्रदेशावर आक्रमणे करून डिचोली, सांखळी हे प्रांत पुन्हा कह्यात घेतले. या वेळी कुडाळचे लखम सावंत, पेडणेचे केशव नाईक देसाई, डिचोलीचे रवळूू शेणवी देसाई आणि सांखळीचे चंदा राणे देसाई यांनी अदिलशहाशी संगनमत करून छत्रपती शिवाजी महाराजांस विरोध केला. हे चौघेही विजापूरच्या आदिलशाहीचे मांडलिक होते. आदिलशाहीशी आणि गोव्यातील पोर्तुगीज सत्तेशी संगनमत करून, त्यांची खुशामत करून ते आपली छोटी राज्ये सांभाळून होते. महाराजांच्या स्वराज्याच्या दिव्य झेपेची कल्पनाही त्यांना नव्हती. महाराजांनी आदिलशाही सैन्याचा पराभव करताच ते पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेले. ते पानेली, कोलवा आणि कांदोळी गावांत राहू लागले.
फुटीरवाद्यांच्या पाठलागाचे निमित्त करून महाराजांचे पुन्हा आक्रमण !
महाराजांची पोर्तुगिजांवर वक्रदृष्टी होती. त्यांनी दीड वर्षापूर्वी फोंड्याच्या आदिलशाही किल्लेदाराला दुर्भाटवरून गुप्त रितीने रसद पुरवल्यामुळे महाराजांना तो किल्ला सर करता आला नव्हता. पोर्तुगिजांचे समुद्रावरील वर्चस्वही त्यांना सलत होते. हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्याजवळील समुद्रावर पोर्तुगिजांचे वर्चस्व होते. पोर्तुगिजांच्या त्या समुद्रात फिरणार्या जहाजांकडून कर भरून फिरण्याचा परवाना घ्यावा लागत असे. महाराजांनाही हा कर भरावा लागला होता. तसेच गोव्यात हिंदूंचा धर्मच्छळ होत होता, मोठ्या प्रमाणात त्यांची धर्मांतरे करण्यात येत होती, हेही त्यांना ठाऊक होते.
पोर्तुगिजांवर आक्रमण करायला महाराजांना निमित्त हवे होते. ते निमित्त आता त्यांना मिळाले. लखम सावंत, केशव नाईक देसाई, रवळू शेणवी देसाई आणि चंदा राणे देसाई हे महाराजांची कुरापत काढून पोर्तुगिजांच्या आश्रयास पळाले. त्यांचा पाठलाग करण्याच्या निमित्ताने १९ डिसेंबर १६६७ च्या रात्री महाराजांनी ७ सहस्र सैन्यासह पोतुगिजांच्या बार्देश आणि सासष्टी प्रांतात प्रवेश केला. १ सहस्र ३०० लोकांना कैद केले. त्यात ४ पाद्रीही होते. या पाद्रयांना महाराजांनी ‘जशास तसे’ या नात्याने हिंदु होण्यास सांगितले असता त्यांनी जेव्हा नकार दिला, तेव्हा त्यांना फाशी देण्याचा हुकूम त्यांनी केला. ती शिक्षा लगेच कार्यवाहीत आली. लखम सावंत आणि मंडळी तिसवाडीत पोर्तुगिजांच्या बालेकिल्ल्यात जाऊन राहिले.
पोर्तुगिजांना तह करण्यास भाग पाडल्यानंतर महाराजांनी पोर्तुगिजांकडून दीड कोटी रुपयांची युद्धखंडणी वसूल करणे !
महाराजांचे सैन्य बार्देश आणि सासष्टी प्रांतांत विखुरले होते. व्हाईसरॉय कोंदी दसां विसेंत यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. कुठल्यातरी गावात शिरलेल्या मराठ्यांच्या मूठभर सैनिकांशी पोर्तुगीज सैन्याची गाठ पडली आणि पोर्तुगिजांना झालेल्या चकमकीत यश मिळाले. व्हाईसरॉयने २९.१२.१६६७ या दिवशी पोर्तुगालच्या राजाला लिहिलेल्या पत्रात आत्मप्रौढीने लिहिले आहे की, आपण केवळ ८४ लोकांनिशी मराठ्यांवर चालून गेलो. त्यांचा पराभव केला आणि शिवाजीस तह करण्यास भाग पाडले; पण ही व्हाईसरॉयची फुशारकी होती. त्याने मराठ्यांचा पराभव केलेला नव्हता. त्यानंतर झालेल्या तहानेच हे सिद्ध होते. महाराज डिचोलीत होते. पोर्तुगिजांच्या वतीने महाराजांकडे तहाची विनवणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते. त्या शिष्टमंडळाचे नेतृत्व रामजी शेणवी कोठारी यांच्याकडे होते. ते डिचोलीत रहाणारे गृहस्थ होते. त्या वेळी झालेल्या तहानुसार महाराजांनी पकडून नेलेल्या युद्धकैद्यांची मुक्तता केली. दीड कोटी रुपयांची युद्धखंडणी पोर्तुगिजांकडून वसूल केली. तसेच लखम सावंत आणि देसाई मंडळी आपल्या राज्यास उपद्रव देणार नाहीत, असे पोर्तुगिजांकडून लेखी आश्वासन मिळवले. पराभूत झालेला राजा कधी शत्रूकडून युद्धखंडणी घेऊ शकतो का ?
महाराजांनी गोवा बेट जिंकण्याची मोहीम आखणे !
वर्ष १६६८ च्या ऑक्टोबरमध्ये महाराजांनी गोवा बेट जिंकण्याचा डाव रचला. त्यांनी सुमारे १ सहस्र ५०० मावळे वेषांतर करून गोवा बेटात हळूहळू पाठवले. योग्य संधी मिळताच महाराजांच्या सैन्याला बेटात प्रवेश देण्यासाठी ते बुरुजाचे दरवाजे उघडणार होते. सैन्याच्या हालचालींचा सुगावा पोर्तुगिजांना लागू नये; म्हणून श्री सप्तकोटेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम महाराजांनी हाती घेतले असावे. मंदिर पूर्ण झाले; पण दुर्दैवाने महाराजांचा कट उघडकीस आला. गोवा बेटावर मोठ्या संख्येने परकीय चेहरे दिसू लागल्यामुळे अधिकार्यांना संशय आला. त्यांनी काही लोकांना पकडले आणि त्यांना चोप देताच कट उघडकीस आला. व्हाईसरॉयला हे सगळे वृत्त समजताच त्याने महाराजांच्या वकिलास बोलावून घेतले आणि तो येताच व्हाईसरॉयने स्वतः त्याच्या मुस्कटात लगावली आणि त्याला अन् पकडलेल्या मावळ्यांना राज्याबाहेर घालवून दिले. महाराजांनी मग पोर्तुगिजांशी सामना करण्यासाठी १० सहस्र पायदळ आणि १ सहस्र घोडेस्वार सज्ज केले. पोर्तुगिजांनीही त्यांच्या बाजूने कडेकोट तयारी केली; पण ते युद्ध झाले नाही.
गोव्यातील हिंदूंवर झालेले अत्याचार खालील लेखात पहा –
Atrocities on Hindus by missionaries in Goa – present and history of Goa
https://www.hindujagruti.org/hindu-issues/hatkatro-khaamb/atrocities-on-hindus
गोव्यातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांमुळे महाराजांचे पोर्तुगिजांशी संबंध बिघडणे !
या घटनांचा सूड घेण्यासाठीच कि काय गोव्यातील धर्मसमीक्षण (Inquisition) च्या अध्वर्यूंना गोव्यात हिंदूंची पोरकी मुले मोठ्या संख्येने असल्याचा आणि त्यांना लपवून ठेवण्यात आल्याचा शोध लागला म्हणून त्यांनी नवीन कायदा करवून घेतला. ‘वडील वारलेल्या अल्यवयीन मुलांचा पालक ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि पालक ठरवील त्याप्रमाणे त्यांना बाटवून खिस्ती करणे, हा होता तो कायदा.’ जे कुणी अशी मुले लपवून ठेवतील, म्हणजे अशा मुलांची नावे ख्रिस्ती धर्मोपदेशकांना कळवणार नाहीत, त्यांना कडक शिक्षा मिळत असे. बाटाबाटीचे सत्र मोठ्या प्रमाणात चालू करण्यासाठी आणि हिंदूंना छळून हतबल करण्यासाठी ११ डिसेंबर १६६९ या दिवशी धर्मसमीक्षण (Inquisition) सभेच्या अध्यक्षांनी हुकूम काढला की, पोरक्या मुलांची नावे आणि त्यांना ज्यांनी लपवून ठेवले आहे, त्यांची नावे ६ दिवसांच्या मुदतीत लोकांनी ‘ख्रिस्त्यांच्या पाद्री पालकाकडे’ (Padre Pay ds Christaos) द्यावी, नपेक्षा त्यांना शिक्षा होईल. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि पोर्तुगिजांचे संबंध बिघडले.
आदिलशाहीच्या अमलाखाली असणारा फोंडा किल्ला आणि काही प्रांत महाराजांनी कह्यात घेणे !
वर्ष १६७२ मध्ये महाराजांनी पेडणे, सांखळी आणि डिचोली या तिन्ही प्रांतांवरील आपले नियंत्रण अधिक बळकट केले. उडी घेण्यापूर्वी वाघ जसा पाय घट्ट रोवून आपल्या स्नायूचे आकुंचन करतो, तशी महाराजांची ही क्रिया होती. ३ वर्षांनी वर्ष १६७५ च्या एप्रिल मासात त्यांनी फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. तो किल्ला अदिलशहाकडे होता. सासष्टी प्रांत पोर्तुगिजांकडे होता. महाराजांना काही वर्षांपूर्वीच्या पराभवाचे उट्टे काढायचे होते. त्यांचे २ सहस्र घोडदळ आणि ७ सहस्र पायदळ या वेढ्याच्या कामात गुंतले होते. मागच्या वेळी फोंड्याच्या किल्लेदाराला पोर्तुगिजांनी रसद पुरवली होती. तसा प्रकार पुन्हा घडू नये; म्हणून महाराजांनी पोर्तुगिजांच्या सासष्टी प्रांतातील चांदर, बेरडे आणि कुंकळ्ळी येथे सैन्य पाठवून लुटालूट करवली. याचा योग्य तोच परिणाम झाला. पोर्तुगीज फोंड्याच्या साहाय्यास जायला धजले नाहीत. ८ मे १६७५ या दिवशी फोंड्याचा किल्ला महाराजांनी सर केला. या विजयामुळे फोंडा किल्ल्याच्या अंमलाखालच्या सर्व प्रदेशावर म्हणजे अंत्रुज, अष्टागार, हेमांडबार्से, चंद्रवाडी, काकोडे, बाळ्ळी, सांगे आणि काणकोण या प्रदेशांवर छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता प्रस्थापित झाली. हे प्रदेश स्वराज्यांत मोडू लागले.
महाराजांनी नार्वेच्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करणे !
महाराजांनी तह करूनही पोर्तुगीज देसाई मंडळींना महाराजांच्या विरुद्ध चिथावणी देऊ लागले. त्यानंतर पुन्हा युद्धाचा प्रसंग येताच पोर्तुगिजांनी वर्ष १६६८ मध्ये देसाईंना आपल्या राज्याबाहेर घालवून दिले. ते मग महाराजांना शरण गेले. या काळात महाराजांचा मुक्काम डिचोलीत होता. त्यांचा मुक्काम डिचोली येथे असतांना नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर देवालयाचा जीर्णोद्धार त्यांनी केला. याचा उल्लेख ’श्रीशिवराज्याभिषेक-कल्पतरु’ या शिवकालीन संस्कृत पोथीत मिळतो.
नार्वेच्या श्री सप्तकोटेश्वर देवालयाला तसा प्रदीर्घ इतिहास आहे. श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर पूर्वी दीपावती अथवा दिवाडी बेटावर होते. कदंब राजघराण्याचे हे आराध्यदैवत होते. चौदाव्या शतकात मुसलमानांनी त्या मंदिराचा विध्वंस केला होता. पंधराव्या शतकात कोकण प्रांत विजयनगरच्या हिंदु राजसत्तेखाली समाविष्ट होताच, विजयनगरचा सेनापती माधव मंत्री यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला; परंतु पोर्तुगिजांनी सोळाव्या शतकात ते पूर्ण नष्ट केले. पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या देवळांपैकी पहिले देऊळ दिवाडीचे होते. पोर्तुगिजांनी विध्वंस केल्यामुळे श्री सप्तकोटेश्वराचे भक्त आणि महाजन यांनी देवाची मूर्ती नदीपलीकडे नार्वे येथे नेली. तेथे एक छोटेसे मंदिर बांधून त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा तळ डिचोली येथे पडला असता त्यांनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराच्या महाद्वारावर खालील लिखाण संस्कृत भाषेत कोरण्यात आलेले आहे. ‘श्री सप्तकोटीश शके १५९० किलंभाद्व कार्तिक कृष्ण पंचम्या स्तोत्रे शिवाराज्ञा देवालयस्य प्रारंभ’. यावरून देवालयाच्या जीणोद्धाराचा प्रारंभ नोव्हेंबर १६६८ या मासात झाला, असे निश्चितपणे म्हणता येते.
नार्वेचे महाराजांनी बांधलेले हे एकमेव मंदिर !
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी करतांना देशावर आणि कोकणात अनेक किल्ले बांधले; पण मंदिरे बांधली नाहीत. नार्वेचे मंदिर हे महाराजांनी बांधलेले एकमेव मंदिर आहे. ते समाजसुधारक होते; कारण बाटवून मुसलमान केलेल्या बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना त्यांनी परत हिंदु धर्मात घेतले होते.
महाराजांनी बार्देश, तिसवाडी, आणि सासष्टी हे तिन्ही महाल पोर्तुगिजांकडून घेण्याची सिद्धता करणे आणि त्यांच्या आकस्मिक निधनाने ते स्वप्न अपूर्ण रहाणे !
बार्देश, तिसवाडी, आणि सासष्टी हे तिन्ही महाल पोर्तुगिजांकडे होते. त्याच्यावर महाराजांना उडी घ्यायची होती. त्यासाठी फोंडा कह्यात घेतल्यावर त्यांनी कारवारची मोहीम काढली. शिवेश्वर, कडवाड कद्रे, अंकोला ही ठाणी हस्तगत करून गंगावळी नदीपर्यंतचा आदिलशाहीत असलेला मुलुख त्यांनी स्वराज्यात आणला. पोर्तुगिजांच्या गोव्यातील राज्याची सीमा आता अशी झाली की, पश्चिमेस अरबी समुद्र आणि पूर्वेस अन् दक्षिणोत्तरकडे मराठी राज्य. महाराजांनी सासष्टी महालाजवळ बेतुल येथे साळ नदीच्या तिरावर एक जलदुर्ग बांधला. हाच ‘काब द राम’चा किल्ला किंवा ‘खोलगड’ होय. या दुर्गाच्या बांधकामात व्यत्यय आणायचा आणि तो मोडून टाकण्याचा सल्ला सल्लागार मंडळाने व्हाईसरॉयला दिला होता; पण व्हाईसरॉयला ते धाडस करवले नाही. पोर्तुगिजांना भूमीवर वेढा घालून आपले बलवान आरमार समुद्रात उभे करून त्यांचा कोंडमारा करण्याचा महाराजांचा विचार असावा. त्यांनी बलशाली आरमारही सिद्ध केले होते; पण १६८० मध्ये महाराजांचे आकस्मिक निधन झाले. महाराजांच्या मृत्यूची वार्ता समजताच गोव्याचे व्हाईसरॉय आंतोनिय पाइश द सांद यांनी उद्गार काढले, ‘छत्रपती शिवाजीच्या मृत्यूमुळे हे राज्य आता काळजीतून मुक्त झाले आहे.’
(संदर्भ : श्री. मनोहर हिरबा सरदेसाई लिखित ‘गोवा, दमण, दिव – स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास’)